कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची चीनच्या कंपनीकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:10+5:302020-12-05T05:04:10+5:30
कुपवाड : खरेदी केलेल्या हायड्रॉलिक जॅक पंप युनिटचे पैसे न देता चीनच्या टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने कुपवाड एमआयडीसीतील पेंटागॉन ...
कुपवाड : खरेदी केलेल्या हायड्रॉलिक जॅक पंप युनिटचे पैसे न देता चीनच्या टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने कुपवाड एमआयडीसीतील पेंटागॉन इंडस्ट्रीज कंपनीची १२ लाख २९ हजार ८८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. १९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यान ही फसवणुकीची घटना घडली. या प्रकरणी चीनमधील टी. मरीन मेकॅनिकल कंपनी, नानतोंग व बारलेक्स बँकेचे पदाधिकारी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कुपवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसीमध्ये पेंटागॉन इंडस्ट्रीज ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीकडून चीनमधील टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने हायड्रॉलिक जॅक प्रोलेक्ट डब्ल्यू ३२ एल. ऑईल पंपची १४८ युनिट १२ लाख २९ हजार ८८ रुपयांना खरेदी केली होती. त्यानुसार पेंटागॉन इंडस्ट्रीजने संबंधित कंपनीकडे पैशाची मागणी केली. मात्र, चीनमधील कंपनीकडून त्यांना बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पेंटागॉन कंपनीच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाहीत. १९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यान ही फसवणुकीची घटना घडली. याबाबत पेंटागॉन कंपनीकडून वारंवार पैशासाठी पाठपुरावा करण्यात आला. तरीही पैसे मिळत नसल्याने अखेर पेंटागॉन कंपनीने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात चीनच्या कंपनीविरोधात फिर्याद दिली आहे. ही फिर्याद कंपनीचे अकौंटंट मिलिंद मोहन सावंत यांनी दिली असून, चीनच्या कंपनीबरोबरच बारलेक्स बँक, खरेदी-विक्री व्यवहारातील अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे तपास करीत आहेत.