जादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:58 IST2025-02-10T15:58:12+5:302025-02-10T15:58:48+5:30

सांगली : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून सेवानिवृत्त कर्मचारी अनिल बाबूराव पाटील (वय ५९, रा. ...

Fraud of 1 crore with the lure of extra refund, case registered against three people including a woman in Sangli | जादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

जादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींची फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

सांगली : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून सेवानिवृत्त कर्मचारी अनिल बाबूराव पाटील (वय ५९, रा. सावरकर कॉलनी, विश्रामबाग) व त्यांच्या नातेवाइकांची १ कोटी ४७ लाख, ८७ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत आशुतोष प्रकाश कासेकर (रा. मीरा रोड, मुंबई पूर्व), पूनम भीमराव भोसले-जाधव (रा. चेतना पंपाजवळ, शंभरफुटी, सांगली), कुणाल सुरेश मिस्त्री (रा. मंगळवार पेठ, शिवाजी पुलाजवळ, कोल्हापूर) या तिघांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित तिघेजण शेअर मार्केटमध्ये काम करतात. तिघांनी फिर्यादी पाटील यांच्या नातेवाईक शोभ शिवगोंडा जैनावर यांना पैशाचेे आमिष दाखवून गुंतवणूक करायला भाग पाडले. या गुंतवणुकीवर त्यांनी तिला थोडा परतावा दिला. त्यामुळे तिचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर तिचे नातेवाईक अनिल पाटील यांच्याबरोबर तिघांनी बैठक घेतली. त्यांच्याकडे निवृत्तीनंतर पैसा आल्यामुळे त्यांना शेअर मार्केटमधील कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त पैसा मिळतो असे आमिष दाखवले. पाटील यांनी पैसे गुंतवल्यानंतर थोडे दिवस परतावा म्हणून काही रक्कम दिली.

पाटील व त्यांच्या नातेवाईक शोभा जैनावर यांनी तिघांकडे एक कोटी ४७ लाख ८७ हजार ५०० रुपये गुंतवले होते. काही दिवसांनंतर तिघांनी पाटील व जैनावर यांना गुंतवणुकीवर परतावा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम मागितली. परंतु तिघांनी त्यांना टाळले. दि. ४ ऑगस्ट २०२१ पासून दि. ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.

अखेर गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आशुतोष कासेकर, पूनम भोसले, कुणाल मिस्त्री या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तिघांचा शोध सुरू आहे.

Web Title: Fraud of 1 crore with the lure of extra refund, case registered against three people including a woman in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.