Sangli: वाईन शॉप परवान्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक, दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 01:15 PM2024-02-21T13:15:18+5:302024-02-21T13:16:57+5:30
विटा : वाईन शॉपचा नवीन परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून विटा येथील यंत्रमागधारक संजय हरिश्चंद्र तारळेकर यांना ५० लाख ...
विटा : वाईन शॉपचा नवीन परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून विटा येथील यंत्रमागधारक संजय हरिश्चंद्र तारळेकर यांना ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी अरुण अर्जुन मोरे (पो. वर्ये, ता., जि. सातारा) व अनिल विष्णू सावंत (रा. मालतवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या दोन भामट्यांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
विटा येथील संजय तारळेकर यांचा टेक्सटाइल्स व्यवसाय आहे. वाईन शॉपचा परवाना घेण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यावेळी दि. ११ मे २०२० च्या दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राने वाईन शॉपचा परवाना काढून देणारे लोक आहेत. त्यांच्याशी संपर्क करूया असे सुचविले. त्यानंतर त्यांनी संशयित अरुण मोरे व अनिल सावंत या दोघांशी संपर्क साधला.
त्यावेळी त्यांनी थेट मंत्रालयात फिल्डिंग लावून नवीन वाईन शॉपसाठी परवाना देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर नवीन परवान्यासाठी संजय तारळेकर यांनी मे २०२० ते आतापर्यंत जवळपास ५० लाख रुपयांची रक्कम संशयितांच्या बँक खात्यावर वर्ग केली. त्यानंतर या दोघांनी तारळेकर यांना अधूनमधून काही कागदपत्रे दिली. मात्र, त्यातील कागदपत्रे बनावट असल्याचे तारळेकर यांच्या निदर्शनास येऊ लागले.
त्यामुळे तारळेकर यांनी दिलेले पैसे परत द्यावेत, अशी मागणी दोघांकडे केली. परंतु पैसे देण्यास दोघांनीही टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय तारळेकर यांनी संशयित अरुण अर्जुन मोरे व त्याचा साथीदार अनिल विष्णू सावंत या दोन भामट्यांविरुद्ध सोमवारी रात्री विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.