सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने चौघांना सव्वा कोटींचा गंडा

By शरद जाधव | Published: March 24, 2023 05:49 PM2023-03-24T17:49:32+5:302023-03-24T17:51:21+5:30

कमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत

fraud of four people with the lure of excess returns In Sangli | सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने चौघांना सव्वा कोटींचा गंडा

सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने चौघांना सव्वा कोटींचा गंडा

googlenewsNext

सांगली : सात महिन्यात दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने चौघांची १ कोटी २२ लाख ४२ हजार ३६० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंद्रशेखर मार्तंड मोरे (रा. कुरूंदवाड जि. कोल्हापूर) यांनी मुजाहिद ऊर्फ राज अस्लम शेख (रा. सुभाषनगर ता. मिरज) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील विजयनगर परिसरातील स्वदेशी हाईटस् या इमारतीत पहिल्या मजल्यावर आदित्यराज कार्पोरेशन, डेल्फीनो ट्रेड, ब्रिझ पॉवर सोल्युशन प्रा. लि. आणि ट्रेड बुल या नावाने संशयिताने कार्यालये सुरू केली होती. फिर्यादी चंद्रशेखर मोरे यांनी आदित्यराज कंपनीत ऑगस्ट २०२१ ते दि. २३ मार्च २०२३ या कालावधीत २७ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.

फिर्यादी मोरे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना गुंतवलेल्या रकमेच्या मोबदल्यात ८ लाख रकमेचा परतावा तसेच आदित्यराज कार्पोरेशनचा १२ लाखांचा धनादेश शेख याने दिला होता. बॅंकेत धनादेश दिल्यावर तो न वटल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी मोरे यांच्या निदर्शनास आले.

याप्रमाणेच आदित्यराज कार्पोरेशन कंपनीत प्रफुल्ल दादासाहेब पाटील (रा. एसटी कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांनी ३३ लाख ३४ हजार ८६० रुपये, संदीप श्रीकांत कोकाटे (रा. खणभाग, सांगली) यांनी ६४ लाख ७ हजार ५०० रुपये, सचिन अरविंद पाटील (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले) यांनी ५ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती. चौघांचीही १ कोटी २२ लाख ४२ हजार ३६० रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जादा परतावा आणि फसवणूक

कमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. शेअर मार्केट अथवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करून त्याद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखविण्यात येते. याप्रकारे फसवणूक झाल्यानंतर अनेक जण पोलिसात तक्रारही दाखल करत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: fraud of four people with the lure of excess returns In Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.