Sangli Crime: दामदुप्पटच्या आमिषाने तब्बल एक कोटीची फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 04:05 PM2023-07-06T16:05:22+5:302023-07-06T16:23:11+5:30
आटपाडी : शेअर मार्केटमध्ये दहा महिन्यात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने तब्बल एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर आटपाडी ...
आटपाडी : शेअर मार्केटमध्ये दहा महिन्यात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने तब्बल एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामजी चंद्रकांत होनमाने (वय ३०, रा. मंगलवेढा जि. सोलापूर, सध्या रा. आटपाडी) यांनी फिर्याद दाखल केली.
याबाबात माहिती अशी की, आटपाडी येथील निहारिका फायनान्सिअल सर्व्हिसेस प्रा.लि या कंपनीच्या कार्यालयामध्ये १९.०५.२०२१ते ०३.१२.२०२१ या कालावधीत कंपनीच्या संतोष रामचंद्र अडसूळ, राहुल अशोक अडसूळ, विनायक शंकर माळी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी सुधीर रामचंद्र अडसूळ, निकिता संतोष अडसूळ, अनिल आनंदा अडसूळ, मल्हारी संजय अडसूळ (सर्व रा. आटपाडी) यांनी फिर्यादी रामजी होनमाने यांच्याकडून ७७ लाख ५८ हजार ९०० रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. यावेळी त्यांना दहा महिन्यात रक्कम दामदुप्पटीचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरवातीस १५ लाख ४० हजार रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. अन् उर्वरीत मुद्दल रक्कम ६२ लाख १८ हजार ९०० रुपये व त्यावरील परतावा न देता फसवणूक केली.
याचबरोबर संतोष सुभाष गुजले यांची १८ लाख ९० हजार, प्रवीण बाळासो बनसोडे यांची ८,५०,६७०, तर यशवंत हरिदास मेटकरे यांची ५ लाख रुपयांची अशी एकूण ९४ लाख ५९ हजार ५७० रुपयांची फसवणूक केली. याबाबात अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ करीत आहेत.