एमबीबीएसला प्रवेशाचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 07:11 PM2022-06-06T19:11:53+5:302022-06-06T19:12:24+5:30
यादव कुटुंबाने प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया हाताळणाऱ्या खंडागळे यांच्याशी संपर्क साधल्यावर ६ एप्रिलपर्यंत शासनाच्या नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. या प्रकाराने यादव कुटुंबीयांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
इस्लामपूर: वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेची मुदत संपूनही पुण्यातील एका मुलीस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत पलूस तालुक्यातील तिघांनी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २२ या कालावधीत घडला आहे.
याबाबत डॉ. सुवर्णा सतीश यादव (५०, रा. शंकरमहाराज मठाजवळ, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून ज्ञानेश्वर बाबूराव पाटील (मूळ रा. नागराळे-पलूस, सध्या-पुणे), स्नेहल संभाजी पवार (कुंडल, ता. पलूस, सध्या-पुणे) आणि हर्षल डाके (कुंडल) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डॉ. सुवर्णा यादव यांचे मूळ गाव इस्लामपूर आहे. त्यांच्या मुलीस एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी त्या प्रयत्न करीत होत्या. त्यावेळी त्यांना या तिघांनी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडे पाटील याने ३० लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्याला यादव यांनी तयारी दाखवली नाही. तरीपण ज्ञानेश्वर पाटील हा प्रवेश मिळवून देतोच अशी बतावणी करत होता. शेवटी त्याला यादव यांनी १९ लाख रुपये दिले.
त्यावर या त्रिकुटाने यादव यांना भुलवत ठेवले. तुमच्या मुलीचा प्रवेश झाला आहे. तिला उद्यापासून पाठवून द्या असे सांगत राहिले. यादव यांनी पैसे भरल्याची पावती आणि प्रवेश मिळाल्याची कागदपत्रांची मागणी केली. ती या भामट्यांनी दिलीच नाहीत. १२ एप्रिलपर्यंत ते यादव यांना काम झाल्याचे सांगत राहिले. शेवटी यादव कुटुंबाने प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया हाताळणाऱ्या खंडागळे यांच्याशी संपर्क साधल्यावर ६ एप्रिलपर्यंत शासनाच्या नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले.
या प्रकाराने यादव कुटुंबीयांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शेवटी यादव यांनी या भामट्यांकडे पैशाची मागणी केल्यावर त्यांनी ३ लाख ९० हजार रुपये परत दिले. उर्वरित रकमेचा धनादेश दिला. मात्र तो न वटल्याने डॉ. सुवर्णा यादव यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
एमबीबीएस पदवीची प्रवेश प्रक्रिया ही शासनस्तरावर नियमानुसार व गुणवत्तेवर होत असते. या प्रवेश प्रक्रियेशी महाविद्यालयाचा संबंध येत नाही. संबंधित पालक व त्यांची फसवणूक केलेल्या व्यक्तीविरोधात महाविद्यालयाची बदनामी केल्याबद्दल कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहोत. संजय शामराव जाधव, अध्यक्ष, प्रकाश इन्स्टिट्यूट, इस्लामपूर