वाळवा येथील सराफी महिलेची २१ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:28 AM2021-04-02T04:28:30+5:302021-04-02T04:28:30+5:30
इस्लामपूर : स्वस्त दरातील सोन्या-चांदीचे दागिने करून देतो, असे आमिष दाखवत उसनवार घेतलेले १५ लाख ६ हजार रुपये आणि ...
इस्लामपूर : स्वस्त दरातील सोन्या-चांदीचे दागिने करून देतो, असे आमिष दाखवत उसनवार घेतलेले १५ लाख ६ हजार रुपये आणि मोडीला आलेले १२ तोळे सोन्याचे दागिने घेऊन वाळवा येथील सराफी व्यावसायिक महिलेची दोघांनी तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. फसवणुकीचा हा प्रकार जुलै २० ते जानेवारी २१ या कालावधित घडला.
याबाबत सुमित्रा प्रतापसिंह भोसले (३७, वाळवा) यांनी गुरुवारी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल रोहिदास वडगावे (आरग, ता. मिरज) आणि श्रीकांत तवन्नप्पा कांते (हुपरी, ता. हातकणंगले) या दोघा कारागिरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी सुमित्रा भोसले यांचे सांगलीच्या सराफ कट्ट्यात सोन्या-चांदीचे लहान दुकान होते. अमोल आणि श्रीकांत हे दागिने बनविणारे कारागीर असल्याने त्यांचे भोसले यांच्या दुकानात येणे-जाणे होते. यातून श्रीकांत कांते याने, माझ्या मित्राचे दुकान आहे, त्याच्याकडून कमी दरात दागिने बनवून देतो, असे फोनवर त्यांना सांगितले. काही दिवसांनी हे दोघे वाळवा येथे श्रीमती भोसले यांना भेटायला आल्यावर, त्यांनी थेट पैशाची मागणी केली. यासाठी अमोल वडगावे याने, आरग येथे माझी शेती आहे, श्रीकांतने सोने नाही दिले, तर मी पैसे परत करतो, अशी हमी दिली. भोसले यांनी आरग येथे जाऊन खात्री केल्यावर दोघांना इस्लामपूर येथे नंदकुमार पाटील या वकिलांकडे नोटरी करून १५ जुलै २० रोजी १५ लाख ६ हजार रुपयांची रक्कम उसनवार म्हणून दिली. ही रक्कम १ जानेवारी २१ पर्यंत द्यायची अट यामध्ये घालण्यात आली होती.
भोसले यांनी पुन्हा महिनाभराने त्यांच्याकडे मोडीसाठी आलेले १२ तोळे सोन्याचे दागिने नवीन करून देण्यासाठी दिले. १ जानेवारीची मुदत संपल्यानंतर सुमित्रा भोसले यांनी पैसे आणि दागिने कधी देणार, अशी विचारणा केल्यावर, या भामट्यांनी टोलवाटोलवी केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुमित्रा भोसले यांनी दोघांविरुध्द पोलिसात फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करत आहेत.