सांगलीत बनावट नोटरी करून महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:07+5:302021-05-20T04:28:07+5:30
सांगली : शहरातील गव्हर्नमेंट कॉलनीत असलेल्या प्लाॅटच्या नियमितीकरणासाठी बनावट नोटरी, मुख्त्यारपत्र तयार करून महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. ...
सांगली : शहरातील गव्हर्नमेंट कॉलनीत असलेल्या प्लाॅटच्या नियमितीकरणासाठी बनावट नोटरी, मुख्त्यारपत्र तयार करून महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी महादेवी सुरेश धुमाळ (रा. कलानगर, सांगली) यांनी अंजना विठ्ठल मोरे, विठ्ठल कृष्णा मोरे, प्रेम विठ्ठल मोरे (सर्व रा. गोंधळेवाडी, ता. जत) यांच्यासह एका वकिलाविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गव्हर्नमेंट कॉलनीतील गजराज कॉलनी येथे फिर्यादी धुमाळ यांच्या नावे प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये नळ कनेक्शन घेण्यासाठी व प्लॉटचे गुंठेवारी नियमितीकरणासाठी ॲड. राजेंद्र शंकर पाटील यांच्याकडून बनावट नोटरी मुख्त्यारपत्र तयार करण्यात आले होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात त्याचा वापर केला होता.
संशयितांनी प्लॉटवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून तारेचे कुंपण व पत्र्याचे शेड लावून फिर्यादी धुमाळ यांना तिथे येण्यास मज्जाव केला होता. याबाबत विचारणा केली असता, तुम्हाला काय करायचे ते करा तुमच्या विरोधात खोटी तक्रार देऊन तुम्हाला सोडणार नाही, अशी दमदाटीही केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.