Sangli: रेवणगावातील भक्तनिवास भाविक, वारकऱ्यांसाठी ठरतेय विसावा केंद्र; मोफत सुविधा उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:10 PM2023-07-13T16:10:45+5:302023-07-13T16:59:41+5:30
शासकीय, देणगीदार यांच्या कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता त्यांनी स्वत:चे लाखो रूपये खर्चून देवस्थान परिसराचा कायापायट
दिलीप मोहिते
विटा : रेवणगाव (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री वेताळगुरुदेव परिसरात सामाजिक कार्यकर्ते विलास नरसू मुळीक यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या भक्तनिवासामुळे येथे येणारे भाविक आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथे भाविकांची राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी, कार्तिक, माघ तसेच चैत्र महिन्यात पायी दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांनाही मोफत सोयीसुविधा मिळणार आहेत.
विटा शहरापासून १४ किलाेमीटर अंतरावर रेवणगाव येथे तीर्थक्षेत्र श्री वेताळगुरुदेव देवस्थान आहे. या देवस्थान परिसराच्या विकासाचे काम मुळीक करीत आहेत. शासकीय, देणगीदार यांच्या कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता त्यांनी स्वत:चे लाखो रूपये खर्चून देवस्थान परिसराचा कायापायट केला आहे.
या निसर्गरम्य देवस्थान परिसरात येणारे भाविक व पंढरपूरला पायी दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी तीन मजली टोलेजंग भक्तनिवास बांधले आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवर प्रत्येकी सहा म्हणजे १२ खोल्या सर्वसोयीनियुक्त आहेत. तळमजल्यावर सभागृह असून, भाविकांसाठी स्वयंपाक तयार करण्यासाठी एक हजार चाैरस फुटाचे स्वयंपाकगृहही बांधले आहे. त्याचबरोबर प्रत्येकी चार शौचालये व बाथरूम आहेत.
पाच हजार चौरस फुटांची इमारत तयार
या भक्तनिवासात सर्व भाविक व वारकऱ्यांना राहण्याची मोफत सोय आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीवेळी मोहित्यांचे वडगाव, पुनवत, रेठरेहरणाक्ष, गगनबावडा, विटा आणि नेर्ले यासह अन्य पायी दिंड्यांतील हजारो वारकऱ्यांनी येथे मुक्काम केला. पाच हजार चाैरस फुटांच्या भक्तनिवासामुळे भाविकांसह वारकऱ्यांची सोय झाली आहे.