विट्यात कोरोना रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:49+5:302021-04-30T04:32:49+5:30
विटा येथे विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. अनिल बाबर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, ...
विटा येथे विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. अनिल बाबर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अमोल बाबर, डॉ. अलोक नरदे, मुख्याधिकारी अतुल पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर मतदारसंघासाठी विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे दिलेल्या अद्ययावत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा बुधवारी आमदार अनिल बाबर, प्रांताधिकारी संतोष भोर यांच्याहस्ते करण्यात आला. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात आता रुग्णांसाठी 'विट्याचा राजा' धावणार असून रुग्णवाहिकेची सेवा मोफत देण्यात येणार आहे.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १०० अद्ययावत रुग्णवाहिका दिल्या आहेत. त्यापैकी खानापूर मतदारसंघासाठी एक रुग्णवाहिका मिळाली असून त्याचे नियोजन विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हाती घेतले आहे.
या लोकार्पण सोहळ्यास विट्याचा राजा मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक अमोल बाबर, माजी जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्याधिकारी अतुल पाटील, गटविकास अधिकारी संदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, डॉ. रामचंद्र नलवडे, डॉ. अलोक नरदे, डॉ. राहुल वारे, डॉ. अभिजित निकम, मंडळाचे उपाध्यक्ष अभिजित ऊर्फ पप्पू पवार, सचिव संजय धडस यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
चौकट :
रुग्णवाहिकेची नि:शुल्क सेवा
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाहीत. ज्या उपलब्ध होत आहेत, त्या रुग्णवाहिका भरमसाट भाडे आकारत आहेत. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विट्याचा राजा मंडळाकडे अद्ययावत रुग्णवाहिका सुपूर्द केली आहे. ही रुग्णवाहिका रुग्णांना नि:शुल्क सेवा देणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बाबर यांनी दिली.