सांगली जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
By अशोक डोंबाळे | Published: June 7, 2023 04:41 PM2023-06-07T16:41:35+5:302023-06-07T16:43:13+5:30
गावातून दिंडी काढून मुलांचे पुष्पगुच्छ देऊन होणार स्वागत
सांगली : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.
पहिली ते आठवीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाकडे पुस्तकांची मागणी केली आहे.
ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत. मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या दहा लाख २५ हजार ४४६ पुस्तकांच्या प्रती मागविल्या आहेत. त्यापैकी दहा लाख पाच हजार ७७७ प्रति मिळाल्या असून ९८ टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. आटपाडी ८३, जत, ९९ आणि शिराळा ९३ टक्के पुस्तके पुरवठा झाला असून उर्वरित तालुक्यात १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या
तालुका विद्यार्थी
आटपाडी १५७३८
जत ४८९९४
कडेगाव १३९७६
खानापूर १७०४१
क.महांकाळ १७२४३
मिरज ३३५०१
पलूस १४३९५
शिराळा १५९१५
तासगाव २५२०१
वाळवा ४००७६
एकूण २४१२५८
एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही
जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. १५ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेशपात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत, असेही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शाळांचा कायापालट
जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतियुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्यशिक्षणावर विशेष भर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे, असेही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
प्रभात फेरीत युवक, गावकरी, ज्येष्ठांनी सहभागी व्हावे
युवक, गावकरी, ज्येष्ठ नागरिकाना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भेटीचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.