शहरात रात्रीच्या संचारबंदीतही मुक्तसंचार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:34+5:302020-12-31T04:26:34+5:30
सांगली : वाढलेली थंडी... रात्री अकरानंतर मुख्य रस्ते निर्मनुष्य... अंतर्गत रस्ते, गल्ली-बोळातील रस्त्यांवर वर्दळ... चौकातील कट्ट्यावर बसलेली तरुणांची टोळकी... ...
सांगली : वाढलेली थंडी... रात्री अकरानंतर मुख्य रस्ते निर्मनुष्य... अंतर्गत रस्ते, गल्ली-बोळातील रस्त्यांवर वर्दळ... चौकातील कट्ट्यावर बसलेली तरुणांची टोळकी... चारचाकी व दुचाकी वाहनांचा मुक्तसंचार... असे काहीसे चित्र मंगळवारी रात्री केलेल्या पाहणीत दिसून आले. प्रमुख रस्त्यांवर दिवसा असणारी वर्दळ तुलनेने रात्रीच्या संचारबंदीत कमी असली तरी, शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी ठरली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ५ जानेवारीपर्यंत महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली. पोलीस व महापालिकेने शासनाचा आदेश शिरसावंद्य मानून अंमलबजावणीची भीमगर्जनाही केली. पण मंगळवारी रात्री केलेल्या पाहणीत उलट चित्र समोर आले. महापालिकेने कागदी घोडे नाचवित पथके नियुक्त केल्याचे जाहीर केले. पण कुठेच महापालिकेचे कर्मचारी दिसत नव्हते. मुख्य रस्त्यावर तर दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांचा, तर अंतर्गत रस्ते, गल्ली-बोळात नागरिक, महिला, तरुणांचा मुक्त वावर होता.
काॅलेज काॅर्नर परिसर
सांगली शहरातील मुख्य चौक व परिसर असलेल्या काॅलेज काॅर्नर परिसरात रात्रीच्या सुमारास शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू होती. दुचाकीवरून तरुण निवांत येरझाऱ्या घातल होते. काही जण तर रात्री अकरानंतर शतपावलीसाठी बाहेर पडल्याचे दिसत होते. त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश होता.
पंचमुखी मारुती रोड
पंचमुखी मारुती रोड परिसरातील अंतर्गत गल्ल्यांत अकरानंतर नागरिकांची वर्दळ सुरू होती. तरुणांचे टोळके हिराबाग काॅर्नरच्या चौकात गप्पा मारत होते. काही नागरिकही शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर होती. घरासमोरील कठड्यावर लोक गप्पा मारत बसले होते.
मुख्य बसस्थानक परिसर
शहरातील मुख्य बसस्थानकातही एसटीची वाट पाहत लोक थांबले होते. बसस्थानकाबाहेरही वाहनांची ये-जा सुरू होती. रात्रीच्या बसने शहरात आलेले नागरिक घरी परतण्यासाठी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत होते. बसस्थानकात मात्र पोलिसांचा पहारा दिसून येत होता.
गावभाग परिसर
गावभाग परिसरातील मारुती चौक व मुख्य रस्त्यावर मात्र वर्दळ तुलनेने कमी होती. एखाद्दुसरी व्यक्ती रस्त्यावर दिसत होती. पण अंतर्गत गल्ल्यांत मात्र वर्दळ अधिक होती. नागरिक घराबाहेर बसल्याचे दिसत होते, तर काहीजण फिरतानाही आढळून आले. तरुणांचे घोळकेही काही ठिकाणी दिसत होते.
पोलीस, महापालिकेची उदासीनता
१. रात्रीच्या संचारबंदीवेळी शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त दिसत नव्हता. काही मोजक्याच ठिकाणी पोलीस होते.
२. शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर मात्र आठ ते दहा पोलीस तैनात करण्यात आले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणीही केली जात होती. दुचाकीचालकांनाही समज देण्यात येत होती.
३. महापालिकेने रात्रीच्या संचारबंदीसाठी स्वच्छता निरीक्षकांची पथके नियुक्त केल्याचे जाहीर केले होते. पण मंगळवारी रात्रीच्या पाहणीवेळी कुठेच ही पथके दिसून आली नाहीत. त्यामुळे ही पथके नेमकी कुठे बंदोबस्तासाठी होती, याचा शोध घेण्याची गरज आहे.
४. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दिवसभरात २० ते २५ रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका व पोलीस विभागात संचारबंदीबाबत उदासीनता आली असावी.