तासगावात ५० बेडचे मोफत कोरोना रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:36+5:302021-05-20T04:28:36+5:30
तासगाव : 'आधी केले आणि मग सांगितले' या उक्तीप्रमाणे, आम्ही तासगावकर कृती समितीतर्फे ५० बेडचे कोरोना केअर सेंटर विलगीकरण ...
तासगाव :
'आधी केले आणि मग सांगितले' या उक्तीप्रमाणे, आम्ही तासगावकर कृती समितीतर्फे ५० बेडचे कोरोना केअर सेंटर विलगीकरण कक्षाची उभारणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे केली आहे. येथील सर्व खर्च आम्ही तासगावकर कृती समिती करणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय कृती समितीकडून बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
एकीकडे तासगावचे लोकप्रतिनिधी कोरोनात सामान्य लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असताना आम्ही तासगावकर कृती समितीने मोफत रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. तासगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तासगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचे तालुक्यातील जनतेकडे दुर्लक्ष असून रुग्ण मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणून, हे मोफत रुग्णालय सुरू करत असल्याचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील म्हणाले, पाच डॉक्टर आणि त्यांच्या टीमकडून इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे उपचार शंभर टक्के मोफत होणार आहे. रुग्णांसाठी शासन नियमानुसार नाश्ता, जेवण मोफत दिले जाणार आहे. सर्व सोयींनी युक्त ऑक्सिजन आणि ॲम्ब्युलन्सची सोय करून कोरोना सेंटर सुरू होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोरोना रुग्णांची मनातील भीती घालवण्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
सर्वसामान्य लोकांना सेवा देणे, हा उद्देश समोर ठेवून हे कोरोना रुग्णालय सुरू केले आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू न ठेवता राजकारणविरहित लोकसहभागाच्या माध्यमातून रुग्णालय सुरू करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. कृष्णा पाटील यांनी सांगितले. रुग्णालयाचा सर्व खर्च सध्या आम्ही तासगावकर कृती समितीतील सर्व १४ पक्ष आणि संघटना करत आहेत. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष सरपंच प्रदीप पाटील, डॉ. विवेक गुरव,
आरपीआयचे संदेश भंडारे, अनिसचे फारूक गवंडी, दोस्ती फाउंडेशनचे मयूर माळी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष खंडू कदम, शरद शेळके, अर्जुन थोरात आदी उपस्थित होते.