आरवडे, आळतेत मोफत अंत्यविधी
By Admin | Published: December 11, 2015 12:14 AM2015-12-11T00:14:36+5:302015-12-11T01:05:29+5:30
ग्रामपंचायतींचा पुढाकार : तासगाव तालुक्यातील सामाजिक बांधिलकीचा उपक्रम -- गुड न्यूज
दत्ता पाटील --तासगाव--माणसाच्या आयुष्याचा खरा प्रवास घरापासून ते स्मशानापर्यंत एवढाच. मात्र स्मशानातील प्रवासासाठी श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत सर्वांनाच खर्च करावा लागतो. ऐनवेळी करावा लागणारा हा खर्च आणि होणारी गैरसोय टाळण्यासाठी तासगाव तालुक्यातील आरवडे आणि आळते ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारा या ग्रामपंचायतींचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत ठरणारा आहे.गावगाडा म्हटले की, त्यामध्ये अनेक जाती आणि धर्मांच्या लोकांचा समावेश होतो. त्यातच अलीकडे राजकारणाचे बदलत असलेले स्वरुप पाहता, गावा-गावात गटा-तटाच्या अभेद्य भिंती असतात. एक गट सत्तेत, तर दुसरा गट विरोधात असतो. गावपातळीवर अनेकदा राजकीय कुरघोड्याही होताना दिसून येतात. सत्तेत आल्यानंतर काही गावे विकासाचा वसा जोपासतात, तर काही गावात विकासाचे स्वप्नच राहते. केवळ विकास करून नव्हे, तर लोकांच्या वैयक्तिक सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायती आणि तेथील कारभारी विरळच. मात्र लोकांच्या सुखाबरोबरच दु:खाचे सांगाती होण्यासाठी तासगाव तालुक्यातील आरवडे आणि आळते ग्रामपंचायतींनी एक समाजाभिमुख उपक्रम सुरु केला. दोन वर्षापूर्वी आरवडे ग्रामपंचायतीने, तर वर्षभरापूर्वी आळते ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक स्तरातील लोकांची गैरसोय आणि आर्थिक कुचंबणा टाळण्यासाठी, अंत्यविधीचे साहित्य मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले. किंंबहुना या गावांनी कोणतेही मतभेद न ठेवता सर्व गावाने एकत्रितपणे निर्णय घेतला. कोणताही भेदभाव न करता सर्वांना अंत्यविधीच्या साहित्याची मोफत सोय करुन देत आदर्श पाऊलवाट निर्माण केली. या गावांची ही वाटचाल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धोरण निश्चित केले. इस्कॉन मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. याठिकाणी पे अॅन्ड पार्किंगची सोय करून उत्पन्नवाढ केली. त्यातून गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना मोफत अंत्यविधीचे साहित्य पुरवले जात आहे. अशाप्रकारचा उपक्रम राबवणारी आमची जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
-युवराज पाटील, माजी पं. स. सदस्य, आरवडे
गावात एखाद्या गरीब कुटुंबावर दु:खद प्रसंग ओढावल्यानंतर अंत्यविधीचे साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले. यासाठी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच अंत्यविधीचे साहित्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला. त्यासाठी लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या खात्यावर ठराविक रक्कम एकरकमी ठेवण्यात आली. या रकमेच्या व्याजावर हा खर्च भागवला जात आहे.
- मनोज पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत आळते