बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन-: गणित-विज्ञान मंडळाचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:52 PM2019-01-02T23:52:18+5:302019-01-02T23:55:47+5:30
शिराळा तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, दहावीनंतर त्यांना क्षमतेनुसार पुढील क्षेत्रामध्ये प्रवेश घेता यावा यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळामार्फत केले जात आहे
सहदेव खोत ।
पुनवत : शिराळा तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, दहावीनंतर त्यांना क्षमतेनुसार पुढील क्षेत्रामध्ये प्रवेश घेता यावा यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळामार्फत केले जात आहे. हा उपक्रम गेल्या बारा वर्षांपासून सुरू आहे. याचे पालक व विद्यार्थी वर्गातून कौतुक होत आहे.
शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असला तरी, गुणवत्तेत सरस आहे. तालुक्यात सुमारे ४९ माध्यमिक विद्यालये असून प्रतिवर्षी सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांना सुटीत दहावीच्या विविध विषयांचे सखोल ज्ञान मिळावे, यासाठी तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करते. गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम विनामूल्य राबविला जात आहे. तालुक्यातील शिक्षकांचे यात योगदान आहे.
गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईटे, मुख्याध्यापक अमृतकुमार पांढरे, संभाजी पाटील, विज्ञान मंडळाचे बी. आर. पाटील, सुहास दळवी, एस. के. पाटील, आर. एन. जगताप, टी. व्ही. सावंत व अन्य सहकारी शिक्षक रविवारी सुटीच्या दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यात एस. एस. पाटील, एस. एम. पाटील, पी. एम. नाझरे, के. एस. जोशी, एस. एम. दंडगे, ए. एम. हाके, एस. पी. यादव, दयानंद घोडके यांनीही आपला सहभाग नोंदविला आहे. ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या उपक्रमासाठी शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशासन व मुख्याध्यापक शिवाजी भोसले यांनी सहकार्य केले आहे.
शेकडो विद्यार्थ्यांना लाभ
विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व आवडीचे क्षेत्र यांची तपासणी केली जाते. त्यानुसार व्यवसायाबाबत संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. याचा लाभ आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना झाला आहे.
तालुक्यातील दहावीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व दहावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना क्षमतेनुसार चांगल्या क्षेत्रात जाता यावे यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक उठाव करत दहावीबरोबरच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही पुढे शिबिर घेण्याचा मानस आहे.
- अशोक भोईटे, अध्यक्ष, गणित अध्यापक मंडळ