कामेरीत कोरोना रुग्णांना मोफत जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:01+5:302021-06-05T04:20:01+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी जेवणाची सोय करून सामाजिक जबाबदारी तिघा दानशूरांनी उचलली आहे. माजी उपसरपंच ...
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी जेवणाची सोय करून सामाजिक जबाबदारी तिघा दानशूरांनी उचलली आहे. माजी उपसरपंच तानाजी माने, दक्षता समितीचे ज्येष्ठ सदस्य सुनील पाटील, माजी सरपंच अशोक कुंभार यांनी गेल्या एक महिन्यापासून येथील शाळेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना दोनवेळचे जेवण मोफत देण्याची सोय केली आहे.
इस्लामपूर शहराबरोबर कामेरीसारख्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येथे दुसऱ्या लाटेत ३ मे अखेर ३६७ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी २७७ बरे झाले; तर आठजणांचा मृत्यू झाला. सध्या ९० बाधित उपचार घेत आहेत. यामध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या व लक्षणे नसणाऱ्या कोरोना बाधितांवर घरी उपचारासाठी परवानगी दिली आहे. मात्र ग्रामीण भागात सर्वच कुटुंबांत वेगळे राहण्याची सोय व स्वतंत्र शाैचालय नसल्याने गैरसोय होत होती. यामुळे कामेरी ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेत रुग्णांसाठी सोय केली. त्यांचा इतर खर्च ग्रामपंचायतीने केला, तरी जेवणाची व्यवस्था करणे अवघड होते.
ही समस्या लक्षात घेऊन तानाजी माने, सुनील पाटील व अशोक कुंभार यांनी रुग्णांसाठी दोनवेळ मोफत जेवण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. असे असले तरी, या रुग्णांना चहा व नाष्टा देण्यासाठी इतरांनी पुढे यावे, असे आवाहन कोरोना दक्षता समितीने केले आहे. सरपंच स्वप्नाली जाधव, ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार, तलाठी आर. बी. शिंदे आदींसह आरोग्य कर्मचारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .