शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:54 AM2020-12-11T04:54:59+5:302020-12-11T04:54:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यांची दहशत कायम आहे. रात्रीच्यावेळी मोकाट कुत्री अंगावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यांची दहशत कायम आहे. रात्रीच्यावेळी मोकाट कुत्री अंगावर येत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या वर्षभरात ५० हून अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. सुदैवाने कुत्र्याच्या हल्ल्यात वर्षभरात तरी कुणाचा बळी गेलेला नसल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले.
शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रात्रीच्यावेळी कामावर पतरणाऱ्यावर कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. दुचाकी वाहन दिसले की मोकाट कुत्री पाठीमागे धावतात. त्यातूनही अपघात वाढले आहे. रात्री बाहेर पायी फिरणाऱ्यावर हल्ले होत आहेत. महापालिकेकडे कुत्री पकडण्याची यंत्रणा अपुरी आहे. त्यात लसीकरणाची मोहिमही थांबली आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसल्याच उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही.
कुत्रे पकडण्यासाठी काय व्यवस्था आहे?
मोकाट कुत्रे पकडण्यासाठी प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. सांगली व मिरजेत प्रत्येक एक डाॅग व्हॅन व सात कर्मचारी आहेत. पण मोकाट कुत्र्यांची संख्या पाहता ही यंत्रणा अपुरी आहे. अजून किमान चार ते पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
या प्रमुख भागांत त्रास : शहरातील सर्वच प्रमुख भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे. शिंदे मळा, वारणाली, विनायकनगर, विजयनगर, खणभाग, गावभाग, संजयनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, लक्ष्मी देऊळ, यशवंतनगर, वखार भाग, इदगाह परिसर या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे.
कोट
मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी यंत्रणा समक्ष आहे. त्यांच्या लसीकरणाची मोहिम थांबली आहे. कोरोनामुळे त्याची निविदा काढता आली नव्हती. लवकरच लसीकरणही हाती घेणार आहोत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तात महापालिका कुठेही कमी पडत नाही. - डाॅ. रवींद्र ताटे, आरोग्याधिकारी, महापालिका.
कोट
मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. अनेकदा महापालिकेला दूरध्वनी करून कुत्री पकडली जात नाहीत. नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. पण महापालिकेची यंत्रणा त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
- दादासाहेब सरगर, संजयनगर