आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:54+5:302021-06-09T04:32:54+5:30
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक ...
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना यातून ३४ कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण रुग्णालयामध्ये देण्यात येणार आहे. इच्छुकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राचे सहायक आयुक्त करीम यांनी केले आहे.
----
महाडीबीटीतून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
सांगली : महाडिबीटी प्रणाली अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी याबाबत सूचना द्यावी. सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत. यात अडचण आल्यास महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोवार यांनी केले आहे.
----
हॉटेलमधून पार्सल सेवेस परवानगी
सांगली : शासनाने कोरोनास्थिती नियंत्रणात येत असताना, अनलॉकसाठी पाच स्तर घोषित केले आहेत. त्यात सांगलीचा चौथ्या स्तरात समावेश आहे. यापूर्वीच्या आदेशात बदल करण्यात आले असून हॉटेल, रेस्टॉरंटसाठी पार्सल सेवेस व घरपोच सेवा सुरू राहतील. बारसाठी फक्त घरपोच सेवा सुरू राहील, असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.
----
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
सांगली : येथील युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्यवतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या इहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शेखर माने,नगरसेवक विष्णू माने, युवराज शिंदे, श्रीकांत पाटील, दिलीप पवार, मानसिंग शिंदे, हैबतराव दिंडी, प्रथमेश धुमाळ आदी उपस्थित होते.
-----
जिल्हा परिषद ते कर्मवीर चौक रस्त्यावर माती
सांगली : शहरातील वर्दळीचा असलेल्या जिल्हा परिषद ते कर्मवीर चौक रस्त्यावर माती पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेशेजारील मैदानात अनेक अवजड वाहने थांबली होती. ती रस्त्यावरून गेल्यापासून रस्त्यावर माती झाली असून पाऊस झाल्यानंतर रस्ता निसरडा होत आहे.