लोकशाहीचे स्वातंत्र्य अनेक मार्गाने परिसीमित

By admin | Published: April 2, 2017 10:36 PM2017-04-02T22:36:34+5:302017-04-02T22:36:34+5:30

जे. एफ. पाटील : मिरजेत अमृतमहोत्सवी सत्कार; कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित

Freedom of democracy is confined in many ways | लोकशाहीचे स्वातंत्र्य अनेक मार्गाने परिसीमित

लोकशाहीचे स्वातंत्र्य अनेक मार्गाने परिसीमित

Next

मिरज : लोकशाहीचे हक्क व स्वातंत्र्य अनेक मार्गाने परिसीमित होत आहे. उदारमतवादी लोकशाहीची संकल्पना विसरली जात आहे. माध्यमांचे स्तंभ पायाभूत होऊन, राजकारणाचे स्वार्थकारण होत आहे. अशा वातावरणात सामाजिक जागरणाची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.
मिरजेत डॉ. जे. एफ. पाटील यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त अमृतमहोत्सव सत्कार समितीतर्फे डॉ. पाटील व सौ. कमलताई पाटील यांचा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. पाटील म्हणाले, आई-वडिलांना शिक्षणाचे मोल माहित असल्याने शिकलो. अभियंता होण्याचे उद्दिष्ट असताना शिक्षक झालो. मात्र शिक्षकी व्यवसायाने भरपूर समाधान दिले. अर्थतज्ज्ञ असूनही पैसे मिळविणे जमले नसल्याची खंत नाही. कारण माणसं उदंंड मिळविली. नायक महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण माझे राष्ट्रीय दैवत आहेत. विचारांशी बांधिलकी, निष्कलंक चारित्र्य, दुर्बलांची कणव, राष्ट्रभक्ती व प्रचंड व्यासंग ही या सर्वांची श्रीमंती होती. मात्र सद्यस्थितीत या तुलनेत पर्यावरणीय पोकळी व प्रदूषण जाणवते. सामाजिक व राजकीय समीकरण आता कालबाह्य होत
आहे. राजकारणासाठी अनंत
काळ संदर्भ असणाऱ्या वैचारिक चौकटीची गरज भूतकाळात जमा होत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या उंचीचे होते. शिवाजी विद्यापीठामुळे मला सामाजिक ओळख मिळाली. इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीमुळे मला सामाजिक
निकष व आशय मिळाला. सत्काराबद्दल डॉ. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. दिलीप नाचणे म्हणाले, जे. एफ. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी मानून काम करताना व्यासंगी अभ्यासक, ध्येयवादी शिक्षक, कुशल प्रशासक अशी भूमिका बजावली. त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून कृषी व्यवस्थेतील मूलभूत समस्या, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, अर्थकारण, दारिद्र्य निर्मूलन यासाठी काय केले पाहिजे, याविषयी लेखन व मार्गदर्शन केले. आपल्या देशात त्यांच्यासारखे उत्तम संशोधक निर्माण होऊ शकतात. देशाची आर्थिक सुकाणू सांभाळण्यासाठी परदेशी तज्ज्ञांची गरज नाही.
माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, जे. एफ. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू झाले नाहीत, मात्र विद्यापीठाचा २० वर्षे जुना अभ्यासक्रम बदलण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
आ. जयंत पाटील म्हणाले, जगातील इतर देशात अर्थतज्ज्ञांना मोठे महत्त्व आहे, मात्र आपल्या देशात अर्थतज्ज्ञांना तितके महत्त्व मिळत नाही. डॉ. जे. एफ. पाटील यांच्याइतकी अर्थशास्त्राची सेवा अन्य कोणीही केली नसेल. त्यांचा सत्कार ही अर्थशास्त्रातील ठळक घटना आहे.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जे. एफ. पाटील यांच्या अध्यापन व संशोधन कार्याची प्रशंसा करून त्यांनी सामाजिक चळवळीला दिशा दिल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रा. वसंतराव देसाई यांनी डॉ. पाटील यांच्या अर्थशास्त्रातील कार्याचा गौरव केला.
यावेळी उद्योजक अरविंदराव मराठे, माजी आमदार हाफिज धत्तुरे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे, बापूसाहेब पुजारी, आर. डी. सावंत यांच्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व डॉ. जे. एफ. पाटील सरांचे विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. जे. एफ. पाटील यांच्या चार पुस्तकांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न इंचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीला देण्यात येणार असल्याचे सत्कार समितीतर्फे सांगण्यात आले. यावेळी डॉ. पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रा. सुनीता माळी यांनी तयार केलेली ध्वनिचित्रफित प्रदर्शीत करण्यात आली. कार्यवाह सुभाष दगडे यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य राजू झाडबुके यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अर्जुनराव महाडिक, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पी. बी. कुलकर्णी, कार्यवाह सुभाष दगडे यांनी सयोजन केले.


डॉ. पाटील यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन
डॉ. पाटील यांनी लिहिलेल्या व सत्कार समितीने पुरस्कृत केलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘व्यक्ती विचार व अर्थ’ या पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याहस्ते, ‘नोटाबंदी काही निबंध’ या पुस्तकाचे आ. जयंत पाटील यांच्याहस्ते, ‘प्रश्न पाण्याचा’ या पुस्तकाचे माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्याहस्ते व ‘कन्फ्रटींग पॉवरटी’ या पुस्तकाचे प्रा. डॉ. दिलीप नाचणे यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.


एक लाखाची देणगी जाहीर : अमृतमहोत्सवी सत्कारानिमित्त प्रा. बी. जी. गोरे यांनी समाजवादी प्रबोधिनीला एक लाखाची देणगी जाहीर केली. बिल गेटस्, टाटा, बिर्ला यांच्यापेक्षा गोरे यांचे दातृत्व मोठे असल्याचे कौतुक जे. एफ. पाटील यांनी केले. विक्रमी रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी जे. एफ. पाटील यांचे व्यक्तिचित्र कार्यक्रमस्थळी रांगोळीत रेखाटले होते.


मिरज येथे रविवारी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील व सौ. कमलताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी (डावीकडून) माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, उद्योजक अरविंदराव मराठे, डॉ. दिलीप नाचणे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आ. जयंत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Freedom of democracy is confined in many ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.