शैक्षणिक धोरणातील वारंवार बदलाने खासगी शिकवणी वर्गाकडे विद्यार्थांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:24 AM2021-03-14T04:24:10+5:302021-03-14T04:24:10+5:30
माध्यमिक विद्यार्थ्याना पूर्वी इंग्रजी, गणित या विषयासाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयासाठी शिकवणीची आवश्यकता होती. ...
माध्यमिक विद्यार्थ्याना पूर्वी इंग्रजी, गणित या विषयासाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयासाठी शिकवणीची आवश्यकता होती. मात्र गेल्या पंधरा वर्षांत परीक्षा पद्धतीत बदल होऊन केवळ लिहिता-वाचता येत असलेले विद्यार्थीही परीक्षा उत्तीर्ण होत आहेत.
पाच-सहा वर्षापूर्वी विद्यार्थांना अभियांत्रिकी शिकवणीची गरज होती. मात्र तंत्रशिक्षण विभागाने केवळ प्रात्यक्षिकांच्या गुणावर उत्तीर्ण करण्याचे धोरण आणल्याने अभियांत्रिकीची परीक्षा उत्तीर्ण होणे सामान्य विद्यार्थांनाही शक्य झाले. यामुळे अभियांत्रिकीचे शिकवणी वर्ग बंद पडत आहेत.
सध्या कोरोनाकाळात विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीत ५० गुणांची प्रश्नपत्रिकेत पंचवीस प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. ऑनलाइन परीक्षा घरातून देताना विद्यार्थी पुस्तकाचा आधार किंवा सहकाऱ्यांची मदत घेऊ शकेल. त्यामुळे विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्याला शिकवणीला जाण्याची गरज राहिली नाही. कॉमर्स क्षेत्रात किंवा इंग्रजी विषयासाठी शिकवणीचीही आता विद्यार्थ्याना गरज नाही. ऑनलाइन शिकवणीचा लाभ घेणारे विद्यार्थी फी देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने शिकवणीचालकांची परिस्थिती कठीण होत आहे. इयत्ता नववीपर्यंत विद्यार्थांना उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे नववीपर्यंत शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थांची संख्या घटली आहे. एकंदरीत दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा असल्याने पन्नास टक्केच विद्यार्थी शिकवणीला जात आहेत. दहावी बोर्ड परीक्षा व बारावीची वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची गरज असल्याने या संबंधित शिकवणी वर्गाना चांगला प्रतिसाद आहे. मात्र विद्यार्थांअभावी पहिली ते नववीपर्यंत व बारावीनंतर पुढील पदवीच्या शिकवणी वर्गाची अवस्था बिकट आहे. संपूर्ण राज्यात खासगी शिकवणी वर्गचालक अडचणीत आले आहेत. ही बाब शासनाने लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात वारंवार बदल करणे थांबवावे, असेही मत डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले.