रत्नागिरी गॅस विरोधात शुक्रवारी आंदोलन
By admin | Published: December 14, 2014 10:11 PM2014-12-14T22:11:04+5:302014-12-14T23:49:11+5:30
अंजनवेल फाटा ते कंपनी गेटपर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन
गुहागर : रत्नागिरी गॅस प्रकल्पाचे व युपीएल कंपनीचे अधिकारी यांनी प्रकल्पात कामगार भरती करताना न्यायालयीन मार्गदर्शकांच्या सूचनांना व निर्णयांना धाब्यावर बसवून कामगारांचे शोषण केले आहे. याबाबत शुक्रवारी १९ डिसेंबरला अंजनवेल फाटा ते कंपनी गेटपर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत बाईत यांनी दिली.
पूर्वाश्रमीचा एन्रॉन दाभोळ वीज प्रकल्प आणि सध्याच्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात कामगार भरती करताना ती कशा प्रकारे व्हावी, याबाबत मुुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अंमलबजावणी न करता अधिकारी व कंत्राटदारांचा मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप बाईत यांनी केला आहे.
यशवंत बाईत यांनी कामगारांच्या न्याय हक्कांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. कंपनीच्या युपीएल या उपठेकेदारांकडून मनमानी कारभार चालू आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये स्थान नाही व जे कामावर आहेत त्यांचे आर्थिक व अन्य प्रकारे शोषण सुरु आहे. युपीएल कंपनी म्हणजे राजकीय ठेकेदारांचा अड्डा बनला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. यासाठी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. प्रकल्पग्रस्त कामगारांना शासनाच्या आदेशानुसार पगार दिला जात नाही. यावर यशवंत बाईत यांनी कंपनीचे निवासी प्रबंधक यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, याकडे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. अखेर कामगारांनी आपले न्याय हक्क मिळविण्यासाठी १९ डिसेंबरला कंपनी गेटसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्याला आला आहे. (प्रतिनिधी)