काका-बाबांच्या दोस्ती-दुश्मनीचा नवा अध्याय सुरू
By admin | Published: June 25, 2016 12:02 AM2016-06-25T00:02:03+5:302016-06-25T00:50:56+5:30
-कारण राजकरण
तंबूत शिरलेल्या उंटांची गोष्ट भाजपसाठी आता जुनी झालीय. त्या उंटांनी सांगलीतल्या भाजपचा तंबू तर पळवून नेलाच, पण त्याच्या पार चिंध्याही करून टाकल्यात. त्याही पुढं जाऊन पक्षाची अब्रू चव्हाट्यावर मांडली. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या ‘संचालक पुनर्स्थापना’ नाट्यानं आणि त्यानंतरच्या आरोप-प्रत्यारोपांनी ते सिद्ध केलं. अवघ्या सांगलीकरांनी हा अगम्य सोहळा अनुभवला! यातून पक्षाचे एक खासदार अन् एक जिल्हाध्यक्ष यांच्यातल्या दोस्ती-दुश्मनीचा नवा अध्याय सुरू झालाय.
भाजपचे खासदार संजयकाका पाटील अन् जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख यांची दोस्ती तशी जुनी. जेव्हा संजयकाकांची दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी खडाखडी सुरू होती, तेव्हा पृथ्वीराजबाबा दुसरे हेवीवेट मंत्री पतंगराव कदम यांच्याशी टक्कर घेत होते. दोघांचाही इतिहास कडव्या संघर्षाचा. दोघांच्याही दिमतीला कट्टर कार्यकर्त्यांची फळी. दोघांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा प्रबळ. विशेष म्हणजे पतंगराव आणि आर. आर. आबांच्या विरोधात दोघांनाही राज्यभरातून रसद पुरवली गेली होती.
तासगाव-पलूस या दोन तालुक्यांच्या सीमेवरचा तासगाव साखर कारखाना काकांच्या चुलत्यांनी म्हणजे दिनकरआबांनी स्थापन केलेला, पण नंतर दिनकरआबांना त्यातून बाजूला केलं गेलं. त्यामागं पतंगराव आणि आर. आर. आबाच असल्याचा आरोप करत काकांनी दोघांशी पंगा घेतला. पुढं काकांच्या गणपती जिल्हा संघानं कारखाना विकत घेतला अन् त्यांची पतंगरावांशी थेट लढाई सुरू झाली. मग राजकीय वैरी एकच असल्यानं काका-बाबांमध्ये दोस्ताना झाला नसता तरच नवल!
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बाबा पक्षासोबत होते, तर काकांची राष्ट्रवादीत नंतर ‘एन्ट्री’ झालेली. पण दोघे अजितदादा पवारांच्या विश्वासातले. त्यातून त्यांनी ’दुष्काळी फोरम’ काढला. सरकारमध्ये असताना आपल्याच मंत्र्यांवर तोफा डागल्या. मोदीपर्व सुरू झालं अन् वेळ साधून काका भाजपमध्ये गेले. खासदार झाले. त्या निवडणुकीत पलूस-कडेगावातून बाबांनी मदतीचा हात दिला. (तो हातचा राखून दिल्याचं सांगितलं जातं.) पुढं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबाही भाजपवासी झाले. त्यांना तिकीट मिळालं. काकांनी मदतीची परतफेड केली, कारण वैरी एकच, पतंगराव! पण बाबांना यश मिळालं नाही. त्यानंतर पक्षात घुसमट सुरू असल्याचं त्यांनी (खासगीत) सांगायला सुरुवात केली. अखेर विधान परिषद, महामंडळाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बाबांना भाजपचं जिल्हाध्यक्ष करण्यात आलं. काका-बाबा एकत्रित ‘नमस्ते सदा वत्सले’चा सूर आळवतात, असं हिणवलं जाऊ लागलं. पण दोघांची वाटचाल समांतर राहिली. अगदी काल-परवापर्यंत. गुरुवारी मात्र दोघांची जबर खडाखडी झाली. पंधरवड्यापूर्वीच काकांनी गुपचूप मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाबांविरोधात गाऱ्हाणं घातलं होतं. तेव्हाच या खडाखडीचा अंदाज आला होता.
‘वालचंद’मधल्या अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळाचा महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटीच्या एका गटाशी वाद सुरू झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वी एमटीईच्या श्रीराम कानिटकर गटानं बाबांना सोसायटीचा अध्यक्ष केलं. त्यावेळी बाबा राष्ट्रवादीत होते. बाबांसारख्या तगड्या नेत्याला पुढं करून अजित गुलाबचंद यांच्या ‘मनी पॉवर’ला ‘मसल पॉवर’नं शह देण्याची ही खेळी होती. (अर्थात खारघर (मुंबई) परिसरात मोठी अभियांत्रिकी शिक्षण संस्था चालवण्याचा गाढा अनुभव बाबांकडं आहेच.) बाबांनी मग मागच्या महिन्यात आपली माणसं गोळा करून (विरोधी गट त्यांना ‘गुंडाची फळी’ म्हणतो!) अजित गुलाबचंद यांच्या गटाच्या प्राचार्य तथा संचालकांना हटवून आपल्या गटाच्या संचालकांची ‘प्रतिष्ठापना’ केली. त्यावर वादळ उठलं. पुन्हा कोर्ट-कज्जे सुरू झाले.
दरम्यान, विरोधी गटानं खेळी खेळली आणि भाजपचे दुसरे नेते दीपकबाबा शिंदेंना पुढं केलं. काकाही त्यात अलवार सामील झाले. बाबांनी जी ‘स्टाईल’ वापरली, तीच काकांनीही योजली अन् पूर्वीच्या संचालकांना पुन्हा गादीवर बसवलं. फक्त झालर लावली सर्वपक्षीय उठावाची अन् ‘वालचंद बचावो’च्या हाकेची. निमित्त साधलं महाविद्यालयाच्या सत्तराव्या स्थापना दिनाचं.
बरं, एवढ्यावर भागलं असतं तर ते भाजपमधलं पेल्यातलं वादळ ठरलं असतं, पण नाही. काका-बाबांनी एकमेकांवर बेछूट आरोप-प्रत्यारोप केले. दोघंही बडे (खासगी) साखर कारखानदार. त्यामुळं ऊस फडातल्यासारखे टीकेचे कोयते चालवले. जागा बळकावण्याचा बाबांचा उद्योग असल्याचं सांगत आपल्याशी गाठ असल्याचा इशारा काकांनी दिला. (काकांची पार्श्वभूमी ज्ञात असलेल्यांना हे नवं नाही!) दुसरीकडं बाबांनीही काकांचे धंदे चव्हाट्यावर मांडले. जागा बळकावण्याचा, घरं-कुळं खाली करण्याचा काकांचा ‘नवा’ उद्योग त्यांनी जगासमोर आणला! काकांच्या ‘सुपारी’चा धंदाही त्यांनी उघड केला. (काका सुपारीचं खांडही खात नाहीत, हे बाबांना माहीत नसावं!) देशातल्या अन् राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे खासदार अन् जिल्हाध्यक्ष एकमेकांवर असे आरोप करताना ते मुकाट पाहण्यावाचून सांगलीकरांच्या हाती काय राहिलंय? खरं तर उठता-बसता साधनशूचितेची बौद्धिकं घेणाऱ्या पक्षाला दिलेली ही चपराकच. दोस्ती-दुश्मनीच्या या नव्या अध्यायाची ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता हैं क्या...
जाता-जाता : मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांनी काका-बाबांना बोलावून घेतलंय. दोघांची समजूत घातली जातेय. शिक्षण क्षेत्रात राजकारण्यांची घुसखोरी नको, म्हणून दोघांनाही बाजूला व्हायला सांगितलं जातं. वालचंद ग्रुप अन् एमटीईचा प्रत्येकी एकेक संचालक महाविद्यालयावर नेमण्याचं ठरलं. काका-बाबांनी ऐकलं, मान्य केलं. पुन्हा दोस्तीच्या आणाभाका घेतल्या. गळाभेटी झाल्या... अन् त्याचवेळी पुनर्स्थापित संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड अन् हटवले गेलेले संचालक डॉ. एम. जी. देवमाने यांचं स्वप्न भंगलं. दोघंही खडबडून जागे झाले... डोळा लागला होता दोघांचाही! फुटबॉलच झालाय त्यांचा..!!
उपेक्षित दीपकबाबा
दीपकबाबा शिंदे-म्हैसाळकर ‘वालचंद’चे माजी विद्यार्थी. ते भाजपमध्ये उपेक्षितच राहिलेत. काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून आलेल्या दीपकबाबांनी भाजपकडून लोकसभा लढवली होती, पण खासदारकीनं हुलकावणी दिली. नंतर पक्षानंही काही दिलं नाही. त्यांच्या मागून आलेल्या संजयकाकांना खासदारकी दिली. अगदी परवा आलेल्या पृथ्वीराजबाबांना जिल्हाध्यक्ष केलं. बाबांना जिल्हाध्यक्ष केल्यापासून ते घुश्श्यातच आहेत. बाबांच्या ‘लॉबी’नं ‘वालचंद’चा ताबा घेताच दीपकबाबा या ‘लॉबी’विरोधात लढायला उतरलेत.
... अन् ‘कार्यक्रम’ झाला!
संजयकाकांनी झाडून सगळ्या पक्षांची माणसं गुरुवारच्या ‘कार्यक्रमा’साठी गोळा केली होती. त्यात जसे ‘काकाप्रेमी’ उदंड होते, तसे स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेली मंडळीही होती. ती बापडी काकांच्या निमंत्रणावरून गेली अन् त्यांना संचालक पुनर्स्थापनेच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावं लागलं. आता ती मंडळी म्हणताहेत, आमचाच ‘कार्यक्रम’ झाला राव!!
श्रीनिवास नागे