आगामी महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीच
By admin | Published: April 9, 2017 12:52 AM2017-04-09T00:52:01+5:302017-04-09T00:52:01+5:30
पतंगराव कदम : संघर्ष यात्रेतील एकी तुटणार नाही
सांगली : आगामी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसह सर्व निवडणुका आघाडीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील, अशी माहिती कॉँग्रेस नेते आमदार पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, संघर्ष यात्रेच्या माध्यमातून निर्माण झालेली काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधकांची एकी आता तुटणार नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी-काँगे्रस एकत्र न आल्याने त्याचे दोघांनाही फळ मिळाले आहे. जर आम्ही एकत्र आलो असतो तर, भाजपला सत्तेपर्यंत पोहोचता आले नसते. त्यामुळे आता शहाणपण घेऊन आम्ही आघाडीच्या माध्यमातून आगामी सर्व निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच सांगली महापालिकेच्या प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीत यासाठीच आम्ही तसा निर्णय घेतला. त्याला यश मिळाले. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीतही आम्ही त्याचपद्धतीचा निर्णय घेणार आहोत.
महापौर नियुक्तीवेळी अडीच वर्षांत तीनजणांना संधी देऊ, असे आम्ही जाहीर केले होते. आता इच्छुक नगरसेवक भेटल्यानंतर सर्वांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. यापूर्वी दगा-फटका होण्याची शक्यता होती. आता राष्ट्रवादी-काँग्रेसच्या एकीच्या निर्णयाने त्यात काही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पलूस-कडेगाव मतदारसंघात १४ कोटी खर्च!
कदम म्हणाले की, अवघ्या अडीच वर्षे सत्तेत आलेल्या भाजप-महायुतीने निवडणुकीचे तंत्रच बदलले. कोणतेही बटण दाबा, मत कमळालाच, असाही फंडा इव्हीएमच्या माध्यमातून अवलंबला. ते आता पुराव्यांसह समोर आले आहे. शिवाय निवडणुकीच्या खर्चालाही ताळतंत्र राहिला नाही. पलूस-कडेगावसारख्या एकेका जिल्हा परिषद मतदारसंघात १४ कोटींपर्यंत विरोधकांनी खर्च केला. वास्तविक नोटाबंदीमुळे सर्वच विरोधी पक्षाकडे निधी नव्हता. भाजपकडे अवघ्या अडीच वर्षांत एवढा पैसा आला कोठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.