आघाडीच्या तहाला सुभेदारांचाच विरोध !
By admin | Published: January 28, 2017 10:43 PM2017-01-28T22:43:00+5:302017-01-28T22:43:00+5:30
फुटलेली शकले जोडणे कठीण : सवत्या चुलींवर कोरड्यास कसं शिजवायचं हाच यक्ष प्रश्न
सागर गुजर -- सातारा
दोन्ही काँगे्रसमधील घटस्फोटाला मोठा कालावधी उलटून गेला आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध काँगे्रस असे चित्र १९९९ पासून कायम आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची दंगल सुरू झाली असताना शत्रूंनी दोन्ही काँगे्रसला चहू बाजूंनी घेरले आहे. या चक्रव्यूहातून सहिसलामत बाहेर पडण्यासाठी काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सध्याची पोषक परिस्थिती असली तरी दोन्ही पक्षांत जे सुभेदार आहेत, त्यांनाच आपल्या सुभ्यात इतरांची ढवळाढवळ नको आहे. त्यामुळे ‘काँगे्रस’ एकत्र न येवो ही तर ‘सुभेदारांची इच्छा,’ असे चित्र सध्या तयार झाले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन्ही काँगे्रसने एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. मात्र, दोन्ही काँगे्रसची प्रमुख नेतेमंडळी याला प्रखर विरोध करताना पाहायला मिळत आहेत. तटकरे यांनी तर ‘दोन्ही काँगे्रसमधील वितुष्टाचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली. तर अशोक चव्हाण यांनीही ‘वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून, आघाडीसंदर्भात चर्चा केली जावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
पक्षीय पातळीवर पक्षाचे नेते आपली इच्छा नितळ असल्याचे बोलून दाखवित असले तरी दोन्ही पक्षांत ज्यांचा जास्त प्रभाव आहे, ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे एकमेकांच्या तोंडाकडेही पाहायला तयार नाहीत, अशा परिस्थितीत बोलणी कशी होणार? हा प्रश्न कायम आहे.
जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करता आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष लक्ष घातले असल्याने काँगे्रस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितींमधील काँगे्रसचा परंपरागत इतिहास पाहता, स्थानिक पातळीवर काँगे्रसची नाळ कायम ठेवून आपल्याच बळावर लढणारी या पक्षातील मंडळींनी वर्षानुवर्षे स्वबळावर ‘सुभे’ निर्माण केले आहेत. या सुभ्यांची सुभेदारी सांभाळताना इतरांची ढवळाढवळ त्यांना खपत नाही. साहजिकच, त्यांना राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचे नेते, कार्यकर्ते हेच प्रमुख शत्रू वाटतात.
जिल्ह्यात काँगे्रस कार्यकर्त्यांचे मेळावे व सभा सुरू असताना भाजप हाच आपला एक नंबरचा शत्रू आहे, असे स्पष्ट करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचा नामोल्लेख टाळतात, यामागे एकतर राष्ट्रवादीशी पुन्हा जुळवून घेण्याची त्यांची इच्छा असावी अथवा राष्ट्रवादीला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असा अहंभाव असावा, असा तर्क लोक सध्या काढताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत वर्षानुवर्षे राहिलेली मंडळी पक्षाशी काडीमोड घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी याला गांभीर्याने घेतलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी कोणाशीही युती, आघाडी करण्याच्या मानसिकतेत नाही. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांनी घेतलेला पंगाही सर्वज्ञात आहे. आता या संपवा-संपवीच्या राजकारणात दोन्ही काँगे्रस एकत्र कसे येणार? वाई, फलटण, खंडाळा, माण, खटाव, सातारा या राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुक्यांमध्ये सुभेदारांची भूमिका अत्यंत जहाल आहे. दोन्ही काँगे्रस एकत्र आले तर वर्षानुवर्षे अस्तित्व निर्माण करण्यासाठी खर्ची घातलेली वर्षे वाया जाण्याची भीती आणि त्यातून निर्माण होणार संताप आज जागोजागी पाहायला मिळतो आहे.
एकमेकांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करणाऱ्या दोन्ही काँगे्रसच्या मंडळींसमोर भाजप, शिवसेना व सध्या गुलदस्त्यात असलेली महाआघाडी यांचेही आव्हान असल्याने काही दिवसांत ‘राजकीय धूळवड’ सर्वत्र पाहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की!