लिंगायत समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा
By admin | Published: July 15, 2014 12:49 AM2014-07-15T00:49:12+5:302014-07-15T00:49:55+5:30
महिलांचा सहभाग : विट्यात धरणे आंदोलन
विटा : लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना ओ.बी.सी. आरक्षण मिळावे, लिंगायत धर्मास अल्प संख्याकांचा दर्जा मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी आज सोमवारी विटा तहसील कार्यालयासमोर खानापूर तालुका लिंगायत व धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने एकदिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातही आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता.
सोमवारी सकाळी लिंगायत व धनगर समाजातील नागरिक मोर्चाने तहसील कार्यालयाजवळ आले. यात महिलांची संख्या मोठी होती. तहसील कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या मंडपात, तर काही नागरिकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांना एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करावी लागली. यावेळी धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शिवाजीराव हारूगडे, प्रवीण लकडे, भक्तराज ठिगळे आदींनी लिंगायत व धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आ. अनिल बाबर, उपसभापती सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विशाल पाटील, सुभाष भिंगारदेवे, अॅड. महेश शानभाग, शौर्या पवार, दत्तोपंत चोथे, रवींद्र भिंगारदेवे, गोपाळ देशपांडे आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली.
आंदोलनात गंगाधर लकडे, राहुल टिंगरे, तात्या कोरे, बाबूराव जंगम, सिध्देश्वर कोरे, प्रवीण लकडे, सुरेश पेटकर, डॉ. मोहन लकडे, सागर लकडे, किशोर डोंबे, राजेंद्र पुणेकर, महादेव कोरे, अमोल कारंडे आदी कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)