इस्लामपुरात हमीभावासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:06 AM2017-11-15T00:06:42+5:302017-11-15T00:07:26+5:30
इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिला.
वाळवा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयासमोर आला. तेथे जाहीर सभा झाली. सभेनंतर तहसील कार्यालयाच्या आवारात सोयाबीन ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. तहसीलदार नागेश पाटील यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
संग्रामसिंह पाटील म्हणाले, मुबलक पाणी असतानाही विजेचे लोडशेडिंग सुरु आहे. विजेबरोबरच तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील गेली ३ वर्षे १५ डिसेंबरपूर्वी खड्डे मुजवणार असल्याची घोषणा करतात. स्वत:ला शेतकरी नेते म्हणवून घेणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शासनात बसून भूलथापा मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने नोटाबंदीतून सामान्य जनतेला कंगाल केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस विरोधात असताना टाळ वाजवून शेतकºयांसाठी आंदोलन करत राज्यभर फिरत होते. आता सत्तेत आल्यावर त्यांना शेतकºयांचा विसर पडला आहे.
माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, ‘मी लाभार्थी’ जाहिरातीतून शासनाची लबाडबाजी सुरु आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने अनेक योजना राबविल्या; मात्र त्याची जाहिरातबाजी केली नाही. शेतकºयांच्य कर्जमाफीला ४ महिने झाले. दिवाळी गेली तरी अजून १ पैसाही जमा झालेला नाही.
आष्टा शहराध्यक्ष अनिल पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिव हुलवान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, कार्तिक पाटील, क्रांतिप्रसाद पाटील, उदय शिंदे, गुरुराज माने, विशाल पवार, उमेश पवार, अमोल गुरव, विशाल सूर्यवंशी, मनोज पाटील, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.