पाण्यासाठी शिराळ््यामध्ये मोर्चा
By admin | Published: March 7, 2017 11:58 PM2017-03-07T23:58:37+5:302017-03-07T23:58:37+5:30
कॉँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे आंदोलन : लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागावर आंदोलनकर्त्यांचा संताप
शिराळा : तालुक्यातील उत्तर भागासह विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या भागाला तातडीने पाणी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चास सुरुवात झाली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. मानसिंगराव नाईक, कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, अशोकराव पाटील सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना मानसिंगराव नाईक म्हणाले की, वाकुर्डे योजनेचे पाणी शेतीपेक्षा औद्योगिक विभागातील कारखानेच जास्त वापरतात. मात्र याचे बिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. पाण्यावर पहिला हक्क पिण्यासाठी, नंतर शेती आणि शेवटी औद्योगिक वापरासाठी करायचा असताना, आज तालुक्यातील उत्तर भाग पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभाग आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, जि. प. सदस्या आशा झिमूर, बाबालाल मुजावर, सुनंदा सोनटक्के, हिंदुराव बसरे, नारायण चव्हाण, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब पाटील, रवींद्र पाटील, संपतराव देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी जि. प. सदस्या अश्विनी नाईक, शुभलक्ष्मी नाईक, राजेंद्र नाईक, विश्वप्रताप नाईक, बाळासाहेब पाटील, पं. स. सदस्य अमर पाटील, माया कांबळे, सुरेश पाटील, डॉ. राजाराम पाटील, पी. वाय. पाटील यांच्यासह महिला, शेतकरी उपस्थित होता. माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
पाण्याचा ५0 टक्केपेक्षा जास्त वापर औद्योगिक वापरासाठीच होतोय
शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याअगोदर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकरी व औद्योगिक यांना वेगळा न्याय का? असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस आघाडी सरकारने वाकुर्डे योजनेस निधी दिला. त्यामुळे या योजनेचे पाणी मोरणा धरण तसेच मांगलेपर्यंत पोहोचले. मोरणा धरण बांधताना औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी उपलब्धतेचा विचार केला गेला नाही. करमजाई तलावात पाणी आल्याने उत्तर भागास पाणी मिळत आहे. या तलावातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन न करता सर्व पाणी सोडून दिले. त्यामुळे या पाणी टंचाईस पाटबंधारे विभाग जबाबदार आहे. त्याचबरोबर वाकुर्डेच्या वीज बिलाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसविले आहे. मात्र या पाण्याचा ५0 टक्केपेक्षा जास्त वापर औद्योगिक वापरासाठी होतो. त्यांच्याकडून औद्योगिक दराने पाणीपट्टी वसूल करा, नंतर शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स तोडण्याची भाषा करा. शेतकऱ्यांना जपण्याची व सांभाळण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी ठेवावी. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहेत, मात्र प्रथम औद्योगिक संस्थांची वीज बिले भरुन घ्या, असे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
उग्र आंदोलन करु
जि. प. सदस्य सत्यजित देशमुख म्हणाले, हा मोर्चा म्हणजे पहिला इशारा आहे. जर आठ दिवसात पाणी मिळाले नाही, तर उग्र आंदोलन करु. करमजाई तलावातील पाणी जि. प., पं. स. निवडणुकीत विजय मिळावा यासाठी तर सोडले नाही ना? टेंभू, म्हैसाळ या योजनेचे वीज बिल जसे टंचाईग्रस्त म्हणून शासन भरते, त्याप्रमाणे येथील बिलही शासनाने भरावे, अशी मागणी त्यांनी केली.