तासगावात खासदारांची मोर्चेबांधणी
By admin | Published: March 24, 2016 11:03 PM2016-03-24T23:03:24+5:302016-03-24T23:46:40+5:30
नगरपालिकेत विकास कामांची धुळवड : सत्तेचे कारभाऱ्यांकडून मार्केटिंग
दत्ता पाटील --तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आणण्याची किमया खासदार संजयकाका पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी करुन दाखवली. आता पुढची पाच वर्षे पालिकेचा गड ताब्यात ठेवण्यासाठी खासदार संजयकाकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दरबारात ठाण मांडून शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. दुसरीकडे भाजपच्या सत्तेचे फलित म्हणून शहरासाठी मिळत असलेल्या निधीचे पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून पुरेपुर मार्केटिंग केले जात आहे. भाजपच्या विकासाची धुळवड ही, पालिका निवडणूकीसाठी असल्याचे दिसून येत आहे. तासगाव नगरपालिकेत पाच महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त सत्तेला खिंंडार पाडून संजयकाकांनी भाजपची एकहाती सत्ता आणली. या काळात संजयकाकांनी शासनस्तरावरुन मुख्यमंत्र्यांकडे वजन वापरुन, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला उपलब्ध करुन दिला. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी आणून तासगावकरांना सुविधा देण्यासाठी भाजपचे सत्ताधारी प्रयत्नशील असल्याचे दाखवून दिले.
संजयकाकांकडून पालिकेसाठी मिळालेल्या निधीचे नगराध्यक्षांसह सत्ताधारी कारभाऱ्यांनी मार्केटिंग सुरु केले आहे. खासदार संजयकाकांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जानेवारी महिन्यात, त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा मार्च महिन्यात शहरातील प्रत्येक प्रभागात विकास कामांचे नारळ फोडण्यात आले. स्वत: संजयकाकांनी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहरातील गल्लीबोळ पिंजून काढले. प्रत्येक प्रभागात कामाचे उद्घाटन झालेल्या ठिकाणी फलक लावण्यात आले. इतकेच नव्हे, तर खासदार संजयकाकांच्या प्रयत्नातून पालिकेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाल्याचे डिजिटल फलकही सत्ताधारी गटाकडून चौका-चौकात लावण्यात आले आहेत.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. या सत्तेचा फायदा पालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना होत असल्याचे चित्र विकास कामांच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत आहे. पालिकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीचे मार्केटिंग करण्यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आतापासूनच कंबर कसल्याचे चित्र आहे. संजयकाकांनीही निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
भाजपमध्ये नाराजीचे आव्हान
पालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी विकास कामांचे मार्केटिंग सुरु केले आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष बदलावरुन भाजपमधील एक गट आग्रही झाला आहे. मात्र संजयकाकांसमोर उघडपणे भावना व्यक्त करण्याचे धाडस होत नसल्याने, नगराध्यक्ष बदलाचा विषय हा चर्चेचे गुऱ्हाळ बनला आहे. नगराध्यक्ष निवड आणि बदलावरुन भाजपांतर्गत नगरसेवकांतच मोठी धुसफूस सुरु आहे. तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांची नाराजीही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे भाजपमधील कारभाऱ्यांच्या नाराजीचे आव्हान पेलावे लागणार आहे.