सांगलीत आयटीआय विद्यार्थ्यांचा मोर्चा
By admin | Published: December 4, 2014 11:09 PM2014-12-04T23:09:33+5:302014-12-04T23:37:41+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नकारात्मक गुणपद्धती रद्द करण्याची मागणी
सांगली : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांची नकारात्मक गुणपध्दती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आज (गुरुवार) स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनाचे नेतृत्व अॅड. सुधीर गावडे, उमेश देशमुख आदींनी केले.
आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नकरात्मक गुणपध्दती सुरू केली आहे.
ही पध्दत सुरू करताना संपूर्ण परीक्षेचे स्वरुप बदलण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आयटीआयचा निकाल वीस टक्क्याहून कमी लागला आहे. ज्या प्रकारची परीक्षेची रचना करण्यात आली आहे, त्याचा मागमूसही विद्यार्थ्यांना नाही. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती १६ ते २० पानांचा पेपर देण्यात येत आहे. त्याचबरोबर नकारात्मक गुण पध्दतीमुळे विद्यार्थी गांगरुन जात आहेत.
त्यामुळे नकारात्मक गुण पध्दती रद्द करुन अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
२० डिसेंबरला मेळावा
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात २० डिसेंबररोजी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. हा निर्णय आंदोलनस्थळी घेण्यात आला.