एफआरपी अडचणीची, तरीही द्यावी लागेल
By admin | Published: January 12, 2015 01:23 AM2015-01-12T01:23:32+5:302015-01-12T01:29:18+5:30
चंद्रकांत पाटील : केंद्र व राज्य शासनाकडून कारखान्यांना मदत देण्याची ग्वाही
सांगली : जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर ९०० रुपयांनी पडले असल्याने कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देता येणे शक्य नसले तरीही कारखानदारांनी स्वत:चा घरचा व्यवसाय समजून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिला पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कारखानदारांना शक्य ती मदत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि चंद्रकांत पाटील यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील. परंतु त्यासाठी काही कालावधी लागेल. सतरा वर्षातील प्रश्न सत्तर दिवसातच सुटावेत अशी अनेकांची अपेक्षा आहे. कारखानदारांनी सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करु नये. आम्ही दिलेल्या आश्वासनांना जागणार आहोत. एलबीटी हटविण्यात येणार आहे. टोलमुक्त महाराष्ट्र हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत सरकारची आर्थिक ओढाताण आहे. त्यानंतर काही चमत्कार होतील असे निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.
आ. गाडगीळ म्हणाले, अडीच महिन्याच्या कालावधित शहर विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. सांगली हा तालुका व्हावा, हरिपूरला भक्त निवासाची निर्मिती व्हावी, विकास आराखडा मंजूर करावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. एलबीटीच्या अटी जाचक असल्याची मला व्यापारी म्हणून कल्पना आहे. जीएसटी कायदा मंजूर झाल्यावर निश्चितपणे एलबीटी रद्द होईल. सांगली शहराच्या विकासासाठी मार्चअखेरकरिता २ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, माजी आ. अजितराव घोरपडे, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, दीपक शिंदे, गोपीचंद पडळकर, दिलीप सूर्यवंशी, प्रकाश बिरजे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)