फळा, खडू कालबाह्य; गुरुजी बनले ‘तंत्रस्नेही’!
By admin | Published: March 14, 2017 10:54 PM2017-03-14T22:54:09+5:302017-03-14T22:54:09+5:30
आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण : १ हजार १७९ शिक्षकांचा सहभाग; अॅण्ड्रॉईड मोबाईल वापरासह इंटरनेटचाही पाठ
कऱ्हाड : पारंपरिक शालेय शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी तसेच बदलत्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग शालेय शिक्षणात करता यावा, या उद्देशाने डायट प्रशिक्षण संस्था व येथील पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील १ हजार १७९ प्राथमिक शिक्षकांना ‘तंत्रस्रेही’ प्रशिक्षण देण्यात आले.
चालू शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या सत्रात सप्टेबर, आॅक्टोबर या दोन महिन्यांत चार टप्प्यांमध्ये मलकापूर येथील सिद्धिविनायक डी.एड कॉलेजमध्ये एकूण ६७२ महिला शिक्षकांना प्रत्येकी दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच दुसऱ्या सत्रामध्ये फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत प्रत्येकी दोन दिवसांचे तीन टप्प्यांत पुरुष प्राथमिक शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील पालिका शाळा क्र. ३ व ९ मध्ये हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा तसेच पालिका शाळांचे असे एकूण ५०७ प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत पहिल्या दिवशी आॅनलाईन उपस्थिती लिंकनुसार गुगल फॉर्म भरून नोंदणी करणे, नवीन जी-मेल खाते तयार करून ई मेल पाठविणे, अॅप शेअर करणे, अॅनिमल फोर्टी प्लस क्युअर एआर फ्लॅश कार्डस अॅपचा अनुभव, वर्ल्ड फाईल बनवून ती पीडीएफ करणे, टेस्टमोज मधून आॅनलाईन टेस्ट बनविणे, पीपीटीच्या साह्याने आॅफलाईन टेस्ट बनविणे, सीएक्यू व क्यूजर क्यूज लायब्ररीमधून टेक्स बनविण्याचे प्रात्यक्षिक शिक्षकांना देण्यात आले.
तसेच मोबाईलचे नेट लॅपटॉपला जोडणे, स्क्रिन शेअरिंग, अॅण्ड्रॉईड व मिरर ओपीचे प्रात्यक्षिक, व्हिडिओ निर्मिती करणे, विविध साफ्टवेअरची ओळख, मुलांना उपयोगी इयत्तानिहाय अॅप्सची माहिती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अनुभव, गुगल फॉर्म बनविणे, गुगल ओळख प्रात्यक्षिके, ब्लॉग वेबसाईट बनविणे, यू ट्यूबवरून व्हिडिओ डाऊनलोड करणे, गणित झेप अॅप्स प्रात्यक्षिक, शिक्षक विद्यार्थी उपयुक्त वेबसाईट आदी विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यशाळेमधून विविध अॅण्ड्रॉईड मोबाईलचा शिक्षणासाठी कसा वापर करावा, संगणक लॅपटॉपच्या साह्याने मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, आधुनिक युगात तंत्रज्ञानाला आलेले महत्त्व ओळखून सर्व शिक्षकांनी तंत्रस्रेही बनणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी तंत्रशुद्ध मार्गदर्शन राज्यस्तरावर तंत्रस्रेही म्हणून काम केलेले महेश लोखंडे, प्रदीप कुंभार तसेच डायटचे एस. डी. होळकर, व्ही. सी. कळसकर यांनी केले. तसेच महिला शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी राजश्री पिठे, पोटे, बालाजी जाधव, राम सालगुडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या नियोजनासाठी गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ गायकवाड व आनंद पळसे यांनी सहकार्य केले. चालू शैक्षणिक वर्षात कऱ्हाड तालुक्यातील प्राथमिक तसेच पालिका शाळेच्या शिक्षकांना हे तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात
आले. (प्रतिनिधी)