टँकरच्या पाणी पुरवठ्यात इंधनाचा अडसर
By admin | Published: July 12, 2015 11:25 PM2015-07-12T23:25:49+5:302015-07-13T00:36:56+5:30
जत तालुक्यातील स्थिती : पेट्रोलपंप चालकांकडून उधारी बंद; वेळेत पाणी मिळेना!
जयवंत आदाटे - जत -तालुक्यातील तीन गावांत चार शासकीय टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परंतु या चार टॅँकरमध्ये डिझेल घालण्यावरून वेळोवेळी वाद निर्माण होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून पेट्रोलपंप चालकांना डिझेलची बिले वेळेत अदा केली जात नसल्याने पेट्रोलपंप चालकांनी उधारीवर डिझेल देणे बंद केले आहे. यामुळे टॅँकरमध्ये डिझेल घालणार कोण?, या वादातून अनेकदा गावामध्ये टॅँकरद्वारे वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
उमराणी गावात दोन व खोजानवाडी आणि अमृतवाडी गावात प्रत्येकी एक याप्रमाणे चार शासकीय टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खासगी टॅँकरसाठी भाड्यामध्ये डिझेलचे बिल धरून एकत्रित बिल काढले जात आहे. शासकीय टॅँकरसाठी भाडे आकारले जात नाही, परंतु त्यासाठी डिझेलची तरतूद करणे आवश्यक असते.
यापूर्वी जत शहरातील एका पेट्रोल पंपावर शासनाचे उधारी खाते घालून टॅँकरचालकास ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून पावती दिली जात होती. टॅँकरचालक पेट्रोलपंप मालकास ही पावती दाखवून टॅँकरमध्ये डिझेल भरून घेत होते. त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर पेट्रोलपंप मालकास शासनाकडून एकत्रित बिल दिले जात होते. परंतु मागील दोन-तीन वर्षात शासनाकडून पेट्रोलपंप मालकांना वेळेत बिल दिले नाही. आठ-दहा महिने हेलपाटे मारून झाल्यानंतर त्यांना त्यांचे थकित बिल मिळाले आहे. या कारणामुळे यावर्षी जत शहरातील एकाही पेट्रोलपंप मालकाने पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरला उधारीवर डिझेल दिले नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप मालकांची भेट घेऊन त्यांना उधार देण्याची विनंती केली असता ते म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त एक ते दीड महिना उधार देऊ, त्यानंतर उधार देणे शक्य होणार नाही. तालुका पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे जत शहरातील पेट्रोल पंपावर शासकीय टॅँकरसाठी डिझेल मिळेनासे झाले आहे, असा आरोप पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावातील नागरिकांमधून केला जात आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरसाठी डिझेलचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक तरतूद असते. परंतु त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेळेवर अनुदान उपलब्ध होत नाही. त्यामुळे पेट्रोलपंप मालकांना त्यांचे थकित बिल वेळेवर देता येत नाही, अशी शासकीय अधिकारी खंत व्यक्त करत आहेत.
शासन पाणीटंचाई कामात हयगय करत नाही, अशी घोषणा वेळोवेळी केली जात असली तरी, ती फसवी आहे, असा आरोप अमृतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)
लोकवर्गणीतून इंधनाचा खर्च
पाणी पुरवठा करणारा टँकरचालक, गावातील ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा करून, ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडून गरज भासेल तसे वेळोवेळी रोख पैसे घेऊन सध्या टॅँकरमध्ये डिझेल घालून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
शासनाने पाणीटंचाईसाठी वेळेवर निधी उपलब्ध करून दिला, तर लोकवर्गणी जमा करून पाणी पुरवठा करण्याची वेळ जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर यापुढे येणार नाही.