इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांचा संप, मिरजेत निदर्शने
By अविनाश कोळी | Published: January 1, 2024 07:15 PM2024-01-01T19:15:03+5:302024-01-01T19:15:26+5:30
नवीन कायदा रद्द करण्याची मागणी
मिरज : केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मिरजेतील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसांचा संप पुकारत निदर्शने केली.
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंडही आकाराला जाणार आहे. याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, सोमवारी मिरजेसह जिल्ह्यातील टँकरचालकांनी संपाची हाक दिली.
हा नवीन कायदा रद्द करा, अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.
यासंदर्भात आंदोलकांनी सांगितले की, चालकांना दहा हजार पगार असतो. त्यामध्ये त्यांचे पोट चालत नाही. चालक हा काही मुद्दाम अपघात करत नाही. नैसर्गिकरित्या अपघात होत असतात. पण, अपघात झाल्यानंतर दहा वर्षं कारावास आणि पाच लाख दंड करण्याचा हा कायदा अन्यायी आहे. तो रद्द करावा या मागणीसाठी सोमवारी ७०० पॅट्रोल- डिझेल वाहतुक करणाऱ्या गाड्या बंद आहेत. जवळपास १४०० चालक वाहक संपात उतरले आहेत.
३ दिवसांत मागणी मान्य होऊन कायदा रद्द झाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा चालक-मालक यांनी दिला आहे. यामुळे जिल्ह्यात पॅट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. निदर्शनावेळी उबेद दर्यावरी, अंकुश गडदे, बापू शिवते, आयाज शेख, फयाज शेख, कल्लाप्पा माळी, सदा कांबळे, अंबर रजपूत, विष्णू सांगोलकर उपस्थित होते.