फरारी संशयिताला गोवा येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:50 AM2021-03-13T04:50:27+5:302021-03-13T04:50:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खाण व्यवसायात भागिदारीचे आमिष दाखवून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जावेद शफी काझी (रा. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खाण व्यवसायात भागिदारीचे आमिष दाखवून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जावेद शफी काझी (रा. फोंडा, उत्तर गोवा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, आष्टा येथील रियाज युनुस लांडगे यांना खाण व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून जावेद काझी व इतर तिघांनी एक कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. सध्या याचा तपास उपनिरीक्षक सुनील भिसे करीत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित जावेद काझी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पथके गोवा येथे गेली होती. पण तो मिळून आला नव्हता. दरम्यान मडगाव पोलिसांना तो एका गुन्ह्याच्या तपासात मिळून आला. त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा येथून अटक केली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक सुनील भिसे, हवालदार अमोल लोहार, विनोद कदम, दीपक रणखांबे, उदय घाडगे, सुनील लोखंडे, सचिन कनप यांनी भाग घेतला.