खुनासह दरोड्यातील फरारीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 04:57 PM2019-08-24T16:57:57+5:302019-08-24T16:59:45+5:30
खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या व पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २५, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव असून त्याला एलसीबीच्या पथकाने काळमवाडी परिसरात शिताफीने अटक केली.
सांगली : खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या व पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २५, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव असून त्याला एलसीबीच्या पथकाने काळमवाडी परिसरात शिताफीने अटक केली.
याबाबत माहिती अशी, खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये व पोलिसांच्या तावडीतूनही पसार झालेल्या मुक्या पवारने तीन जिल्ह्यात गुन्हे केले आहेत. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पवारच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथक तयार केले होते.
त्यानुसार या पथकाने सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेत त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालविले होते. शुक्रवारी एलसीबीचे पथक इस्लामपूर, पेठनाका परिसरात असताना त्यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुक्या पवार हा काळमवाडी परिसरात लपला आहे. त्यानंतर पथकाने तातडीने तेथे जाऊन सापळा रचत त्याला शिताफीने पकडले.
मुक्या पवार हा अनेक गंभीर गुन्ह्यांतील सराईत व क्रूर गुन्हेगार आहे. १४ आॅगस्ट २०१७ मध्ये उदगाव (जि. कोल्हापूर) येथे मुक्याने साथीदारांसह सात लाखांचा दरोडा टाकताना, त्या घरातील अरुणा बाबूराव निकम यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता, तसेच बाबूराव निकम गंभीर जखमी झाले होते.
या गुन्ह्यातील त्याच्या सहभागामुळे त्याला अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना प्रकृती बिघडल्याने त्यास सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना, १ आॅक्टोबर २०१७ रोजी पहाटे रखवालीतून तो पसार झाला होता.
फरार असताना त्याने शिरसी (ता. शिराळा) येथे सुनंदा अशोक शिरसाठ यांच्या घरावर दरोडा टाकून एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. एलसीबीने यातील काही दरोडेखोरांना अटक करत माल हस्तगत केला होता. तसेच दि. १ एप्रिल २०१९ रोजी तुजारपूर येथील भास्कर तातोबा यादवी यांच्या मळ्यातील घरावर दरोडा टाकत ३ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यातही अन्य साथीदारांसह त्याचा सहभाग होता.
लोणंद (जि. सातारा) येथील संतोष जयवंत खरात यांच्या घरावर खुनासह दरोडा टाकला होता. यात शांताबाई जयवंत खरात यांच्यावर वार करण्यात आला होता. त्यात त्या मृत झाल्या होत्या. या दरोड्यात २० हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्काअंर्तगत सांगली व सातारा जिल्ह्यात कारवाई झाली होती.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, शरद माळी, युवराज पाटील, बिरोबा नरळे, उदय माळी, सागर लवटे, संदीप गुरव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.