शिक्षण सेवकांना दिवाळीची भेट, ऑक्टोबरपासून मिळणार फूल पगार; राज्यात पहिलाच यशस्वी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:32 PM2022-10-04T12:32:04+5:302022-10-04T13:11:06+5:30
हे सर्व शिक्षक अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करत होते.
सांगली : जिल्ह्यातील ४५० शिक्षण सेवकांपैकी चक्क ३८३ शिक्षण सेवकांना दि. १ ऑक्टोबरपासून फूल पगार देऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवाळीची भेट दिली आहे. राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोगाबद्दल शिक्षण सेवकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
जिल्हा परिषद शाळेत ४५० शिक्षकांनी शिक्षण सेवक म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. हे सर्व शिक्षक अत्यंत तुटपुंज्या ६००० वेतनावर काम करत होते. या शिक्षकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना कसरत करावी लागत होती. या शिक्षण सेवकांचा दि. ३० सप्टेंबर २०२२ मध्ये तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. या पात्र ३८३ शिक्षण सेवकांना दि. १ ऑक्टोबरपासून पूर्ण पगार मिळणार आहे.
जिल्ह्यातील ३१ शिक्षण सेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र ठरले आहेत. मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करताच त्यांनाही नियमित करण्यात येणार आहे. एक शिक्षण सेवक बेकायदेशीर गैरहजर असल्यामुळे त्यांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच सात शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण नसल्यामुळे त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली नाही. या शिक्षकांच्या फायली तयार असून त्यांचाही कालावधी पूर्ण होताच नियमितीकरणाचे आदेश त्यांना मिळणार आहे.
शिक्षक संघटनांकडून प्रशासनाचे कौतुक
राज्यात प्रथमच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले. म्हणूनच एकाच वेळी चक्क ३८३ शिक्षण सेवकांना नियमितीकरणचे आदेश मिळाले आहेत. या शिक्षकांना कोणताही आर्थिक त्रासही झाला नसून अशा पद्धतीने प्रथमच नियुक्तीचे आदेश दिल्याबद्दल प्रशासनाने अभिनंदन, असे संदेश शिक्षक संघटनांनी सोशल माध्यमांवर फिरत होते.