फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:15+5:302021-01-22T04:24:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे २२ जानेवारी रोजी लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे २२ जानेवारी रोजी लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, लोकनेते स्व. फत्तेसिंगआप्पांची व आई स्व. लीलावती नाईक यांची २२ जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे. या औचित्याने शिराळा विधानसभा मतदारसंघ व शाहूवाडी तालुक्याच्या विकासासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या आप्पांच्या स्मृती चिरंतन जतन व्हाव्यात म्हणून कारखाना कार्यस्थळावर त्यांचे स्मृतिस्थळ व पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्व. आप्पांचे संपूर्ण जीवन संघर्षात गेले. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठा संघर्ष केला. विश्वास कारखान्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांत बळ निर्माण केले. शिराळा व शाहूवाडी तालुक्यात विविध पाणीयोजना उभ्या केल्या. शिराळा तालुक्यातील उत्तर विभागासाठी वाकुर्डे योजनेची संकल्पना मांडून त्याचा शासन दरबारी पाठपुरावा केला. एकूणच लोकनेते स्व. आप्पांचे जीवन सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी समर्पित होते. त्यांनी शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व कष्टकरी, शेतकरी व समाजाच्या तळागाळापर्यंत राबणाऱ्या हातासाठी केलेल्या कामाची हे स्फूर्तिस्थळ चिरंतन प्रेरणा देत राहील.
म्हणूनच या स्थळाचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुणअण्णा लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी ३ वाजता कारखाना कार्यस्थळावर चिखली येथे संपन्न होईल. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील असलेल्या शिराळा, शाहूवाडी तसेच वाळवा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.