Sangli: गुढे-पाचगणी सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी दीड कोटीचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 05:47 PM2024-09-12T17:47:06+5:302024-09-12T17:47:35+5:30
कोकरूड : गुढे पाचगणी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून एक कोटी पासष्ट लक्ष रुपये मंजूर असून लवकरच सर्वेक्षण सुरू ...
कोकरूड : गुढे पाचगणी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून एक कोटी पासष्ट लक्ष रुपये मंजूर असून लवकरच सर्वेक्षण सुरू होणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, समान पाणीवाटप चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
दि. १० सप्टेंबर रोजी सिंचन भवन, कोल्हापूर येथे कृष्णा खोरे कोल्हापूर अधीक्षक अभियंता व अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. गुढे पाचगणी उपसा योजना टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून शिराळा, कऱ्हाड दक्षिण आणि पाटण तालुक्यातील काही गावे मिळून २० हजार हेक्टर क्षेत्र बंद पाइपलाइनने ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची बचत होणार आहे. आटपाडी तासगावनंतर या उपसा योजनेद्वारे सामान पाणीवाटपाचा दुसरा टप्पा यशस्वी होत आहे.
या बैठकीत मुख्य कालव्याच्या ० ते २६ कि. मी.मधील सूक्ष्म सिंचनासाठी ५७ कोटी रुपयांचा प्रस्ताव असून त्यालाही मंजुरी मिळणार आहे. तसेच मुख्य कालवा गळती काढण्यासाठी अस्तरीकरण आणि पोट कालवे दुरुस्ती अंदाजपत्रक केले असून, त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे.
१७ व १८ सप्टेंबर रोजी डॉ. पाटणकर आणि कृष्णा खोरे अधिकारी हे स्वतः या सर्व्हेसाठी पाहणी करणार आहेत. कृष्णा खोरेचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे- कार्यकारी अभियंता देवानंद शिंदे, स्मिता माने, उपविभागीय अभियंता अनिल लांडगे, मिलिंद किटवाडकर यांच्यासह ‘श्रमुद’चे राज्य सदस्य सखाराम पाटील शंकर पाटील, उदय पाटील, सचिन मोरे, संदीप पाटील उपस्थित होते.
मानेवाडी पाचगणीत २८ रोजी विजयी मेळावा
या विभागातील लोकांसाठी अनेक वर्षांपासून गुढे पाचगणी उपसा सिंचन योजना व्हावी, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असून हे काम मार्गी लागल्याबद्दल २८ सप्टेंबर रोजी मानेवाडी (पाचगणी) येथे डॉ. भारत पाटणकर यांचे अध्यक्षतेखाली तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा विजयी मेळावा होणार असल्याची माहिती ‘श्रमुद’ राज्य सदस्य वसंत पाटील यांनी दिली.