अयोध्येतील राममंदिरासाठी पश्चिम महाराष्ट्रात निधी संकलन अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:35+5:302021-01-09T04:21:35+5:30
सांगली : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी जिल्ह्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. जानेवारीअखेर मोहीम राबविण्यात येत असून प्रचंड प्रतिसाद मिळत ...
सांगली : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी जिल्ह्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. जानेवारीअखेर मोहीम राबविण्यात येत असून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादा वेदक यांनी दिली.
मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे निधी संकलन महाअभियान सुरू झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जानेवारीमध्ये संकलन सुरू आहे. पहिल्या पंधरवड्यात मोठ्या दात्यांशी संपर्क साधला जाईल. दोन हजारांपासून पुढे निधी स्वीकारला जाईल. देणगीदारांना आयकरात सूट मिळणार आहे. दुसऱ्या पंधरवड्यात ७३५ गावांत विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व रामभक्त घरोघरी पोहोचतील. १० रुपये, १०० रुपये व १००० रुपयांच्या कुपनांद्वारे निधी संकलन होईल. या धनसंग्रहाच्या माध्यमातून घरघर संपर्कही साध्य केला जाणार आहे. दोन हजार महिला दुर्गा व साडेतीन हजार कार्यकर्ते सहभागी होतील.
वेदक म्हणाले की, राममंदिर व बाबरी मस्जिद संघर्ष हिंदू-मुस्लिम नव्हता, तर राष्ट्रीय व अराष्ट्रीय होता. सर्वोच्च न्यायालयाने ६७ एकर जागा न्यासाला देऊन सर्वमान्य तोडगा काढला. एक हजार वर्षे टिकणारे तीन मजली मंदिर उभे राहील. त्यामध्ये प्रत्येकाने आर्थिक सहभाग द्यावा. बैठकीला जिल्हा संघचालक विलास चौथाई, सांगली, सातार्याचे विभागीय कार्यवाह प्रा. सुनील कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने, निधी समितीचे जिल्हा प्रमुख सुहास जोशी, सहप्रमुख संजीव चव्हाण, योगेश शिरगुरकर, मोठा निधी प्रमुख शैलेंद्र तेलंग, विनायक राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.
चौकट
मुंबईच्या उद्योजकाकडून ७ कोटींचे कळस
मुंबईतील बैठकीत एका उद्योजकाने श्रीराम मंदिरासाठी पाच सोन्याचे कळस देण्याचे जाहीर केले. त्यांची किंमत सात कोटी रुपये होते.
चौकट
रामभक्त मुस्लिमांचाही निधी स्वीकारणार
वेदक म्हणाले की, मंदिर उभारणीसाठी रामभक्त मुस्लिम पुढे आले तर त्यांच्याकडूनही निधी स्वीकारला जाईल. शिवाय सर्व रामभक्तांकडून रोख पैशांसोबतच सोने-चांदीही स्वीकारली जाईल.
---