वसंतदादा स्मारकामधील उर्वरित कामांना निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:46+5:302021-02-13T04:26:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या स्मारकासाठी शासनाने आतापर्यंत आठ कोटी १७ लाख रुपयांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या स्मारकासाठी शासनाने आतापर्यंत आठ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून स्मारकाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे निधीअभावी अपूर्ण आहेत. त्याकरिता निधी मिळावा, अशी मागणी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, परिवहनमंत्री अनिल परब, तसेच सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सध्या स्मारकामध्ये वसंतदादांचा पुतळा, प्रदर्शन हॉल, आर्ट गॅलरी, वाचनालय, अभ्यासिका यांचे काम पूर्ण झाले आहे. अभ्यासिका व वाचनालयामध्ये गरजू विद्यार्थींना लाभ होत आहे. स्मारकामध्ये व्यासपीठाची कामे, सभागृहातील आसनव्यवस्था, आगप्रतिबंधक यंत्रणा, ध्वनी, पडदे, रंगमंच विद्युतीकरण, माहिती व दिशादर्शक फलक, फर्निचर दुरुस्ती, प्रसाधनगृह दुरुस्ती, वातानुकूलिन यंत्रणा, फोटो गॅलरी, कलादालन, मोकळ्या जागेवरील डोम तयार करणे तसेच परिसरातील इतर दुरुस्त्या व परिसर विकसित करणे अशी कामे अजूनही अपूर्ण आहेत. याकरिता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी ४ कोटी ९७ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून अव्वर सचिवांना पाठविला जाणार आहे. तरी या प्रस्तावानुसार उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
फोटो ओळ : सांगलीतील वसंतदादा स्मारकातील अपूर्ण कामांना निधी मिळावा, या मागणीचे निवेदन विशाल पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले.