पाझर तलाव व बंधाऱ्यांसाठी पावणेचौदा कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:50+5:302021-02-25T04:32:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळाले आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळाले आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येत असून शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिकांना पाणी येण्यासाठी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यात येत आहे. या कामासाठी १३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. अनिल बाबर यांनी दिली.
ते म्हणाले, टेंभूच्या पाण्यामुळे माळरान जमिनी आता बागायती झाल्या आहेत. शेतकरी विविध पिके घेऊ लागल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. त्याचाच परिणाम म्हणून ठिकठिकाणी विहिरी व कूपनलिका घेतल्या जात आहेत. या कूपनलिका, विहिरींना पाणी येण्यासाठी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याची मागणी वाढू लागली आहे.
त्यामुळे या मागणीचा विचार करून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी १३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खानापूर तालुक्यातील पोसेवाडी तलावास ३ कोटी ८३ लाख, हिवरे येथील तलावास ४ कोटी ९६ लाख, तर कार्वे येथील तलावास ४ कोटी ८२ लाख निधी मंजूर झाला आहे.
चौकट :
आटपाडी तालुक्यासाठीही निधी मिळणार
खानापूर तालुक्यातील पोसेवाडी, हिवरे व कार्वे तलावासाठी पहिल्या टप्प्यात निधी मंजूर केला आहे. त्यापध्दतीने आटपाडी तालुक्यातील पिंपरी व चिंचाळे येथील पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठीही लवकरच भरीव निधी मंजूर करून घेणार असल्याचे आ. अनिल बाबर यांनी सांगितले.