शिराळ्यातील विविध विकास कामांसाठी पाच काेटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:44+5:302021-05-06T04:27:44+5:30
शिराळा : शिराळ्याच्या विकासासाठी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला ...
शिराळा : शिराळ्याच्या विकासासाठी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाईक म्हणाले, विविध योजनांतून सातत्याने विकास निधी देणाचे काम केले आहे. शिराळा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे सर्व सोयी-सुविधा असायला हव्यात. नगरपंचायत आपल्यापरीने विकास साधत आहे. नागरिकांनी सातत्याने माझ्यावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम केले आहे. त्यामुळे येथे विकास कामे राबविणे हे माझे कर्तव्य आहे. येथे सुविधा निर्माण करताना उपजिल्हा रुग्णालय, बस स्थानक इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, औद्योगिक वसाहत पाणी योजना व वीज उपकेंद्र, अंबामाता मंदिर सुशोभिकरण, अंतर्गत सर्व रस्ते काँक्रिटीकरण व डांबरीकरण, गटर बांधकाम, प्रत्येक समाजासाठी सामाजिक सभागृह अथवा सांस्कृतिक भवन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसतिगृह, पंचायत समिती इमारत, पदपथ, गोरक्षनाथ मंदिर व पीर सल्लाउद्दीन दर्गा विकास, पिण्याच्या पाण्याची योजना आदी विकासकामे केली आहेत. तोरणा ओढा तसेच किल्ला विकास योजना व छत्रपती संभाजी महाराज स्मारक करण्याचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
आता नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. नामदेव मंदिर परिसराची सुधारणा व सुशोभिकरणासाठी २० लाख, दत्त मंदिर परिसर सुधारणा व सुशोभिकरणासाठी २५ लाख, लोहार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणीसाठी १० लाख, वाणी समाजाच्या स्मशानभूमीसाठी २० लाख, तेली समाज स्मशानभूमीसाठी २० लाख, सुजयनगरमधील अंतर्गत रस्त्यांसाठी २० लाख, विविध विभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व आरसीसी गटर बांधणीसाठी २.५५ कोटी, श्रीकांत सागावकर घर ते मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या तोरणा ओढ्यावर साकव बांधण्यासाठी ५० लाख, मटण मार्केट व मासे मार्केट इमारतीसाठी १ कोटी, असा विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.