नवीन आरटीओ कार्यालयासाठी अखेर निधी मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:22 AM2021-01-14T04:22:15+5:302021-01-14T04:22:15+5:30
सांगली : बऱ्याच वर्षांपासून मागणी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओ कार्यालयाच्या कामासाठी शासनाने ४९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. ...
सांगली : बऱ्याच वर्षांपासून मागणी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओ कार्यालयाच्या कामासाठी शासनाने ४९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे जुन्या बुधगाव रस्त्यावर लवकरच या कार्यालयाच्या कामाला सुरूवात होणार आहे. पुढील सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.
सांगलीतील आरटीओ कार्यालय सध्या माधवनगर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असून, याठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयासाठी सुसज्ज जागेची प्रतीक्षा होती. सावळी येथे काही कामकाज चालू असले तरी त्याचाही उपयोग होत नाही. त्यामुळे शहरात जुन्या बुधगाव रस्त्यावर असलेल्या जागेचा प्रस्ताव देण्यात आला होता. या जागेला मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामासाठी निधीची प्रतीक्षा होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ४९ लाख ७३ हजारांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्याला शासनाने मंजुरी दिली असून, या कामासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. येत्या महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करत प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार असल्याने बऱ्याच वर्षांपासून मागणी असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या कामाला सुरूवात होणार आहे.