नगरपंचायतींना निधीची उपलब्धता करून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:20 AM2021-01-10T04:20:27+5:302021-01-10T04:20:27+5:30
सांगली : जिल्ह्यातील नागरी भागात समस्यांची सोडवणूक करत त्याठिकाणी सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषद ...
सांगली : जिल्ह्यातील नागरी भागात समस्यांची सोडवणूक करत त्याठिकाणी सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषद असलेल्या शहरात विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत प्रस्ताव आल्यानंतर तातडीने त्याची उपलब्धता करून दिली जाईल, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगलीत दिले.
जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये सुरू असलेली विकासकामे व त्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आमदार अनिल बाबर, सुमनताई पाटील उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत अथवा नगरपरिषद झाल्याने या शहरांचा विकास होत आहे. सध्या काही शहरात नागरी समस्या जाणवत असल्या तरी त्याची तातडीने सोडवणूक करण्यास प्रशासन प्राधान्य देणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरी भागाला विकासकामांसाठी निधीची उपलब्धता करून देण्यासाठी मागे पडणार नाही. काही शहरातील पाणी पुरवठा योजनांची कामे रखडली आहेत, तर काही तांत्रिक कारणाने सुरू झाली नाहीत, याठिकाणी तातडीने कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करण्यात येईल.
यावेळी जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
यावेळी नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी पलूस पाणीपुरवठा योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या; तर विटा व तासगाव येथील पाणीपुरवठा योजनांचाही आढावा घेण्यात आला.