विट्यात आरोग्य विभागाची काढली अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:39+5:302021-07-10T04:18:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खानापूर तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा आकडा आरोग्य विभागाने लपविल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांच्या संतप्त ...

Funeral of the health department in Vita | विट्यात आरोग्य विभागाची काढली अंत्ययात्रा

विट्यात आरोग्य विभागाची काढली अंत्ययात्रा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : खानापूर तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा आकडा आरोग्य विभागाने लपविल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी ही अंत्ययात्रा गणेश पेठेजवळ रोखल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. या तिरडी मोर्चाने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने खानापूर तालुक्यात ६२६ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा खरा आकडा जाहीर केला.

आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात खानापूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ११९ असल्याचे सांगितले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी विविध ठिकाणाहून माहिती घेतल्याने ही संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोहिते यांनी आरोग्य विभागाने मृत्यू झालेल्या रुग्णांची खरी आकडेवारी जाहीर करावी अन्यथा आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार शुक्रवारी शंकर मोहिते, नगरसेवक दहावीर शितोळे, अमर शितोळे, विठ्ठलराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला. हा मोर्चा गणेश पेठेजवळ आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या खांद्यावर असलेली तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे यांच्यासह पोलिसांनी तिरडी हिसकावून घेतली.

त्यानंतर आरोग्य विभागाविरोधात घोषणा देत आंदोलक तहसील आवारात आले. त्याठिकाणी तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. लोखंडे यांनी खानापूर तालुक्यात कोरोनाने ११९ नव्हे तर ६२६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पोर्टलवरून मिळाल्याचे सांगितले.

खानापूर तालुक्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या सर्व ६२६ रूग्णांची यादी शासनाला सादर करून नातेवाईकांना न्याय दिला जाईल, कोणताही नातेवाईक लाभापासून वंचित राहणार नसल्याचे आश्वासन डॉ. अनिल लोखंडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

Web Title: Funeral of the health department in Vita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.