सोरडीत शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:00+5:302021-05-21T04:27:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : देशासाठी प्राणाची बाजी लावणारे जवान सचिन नामदेव चाबरे (वय २६ ) यांच्यावर गुरुवारी त्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : देशासाठी प्राणाची बाजी लावणारे जवान सचिन नामदेव चाबरे (वय २६ ) यांच्यावर गुरुवारी त्यांच्या गावी सोरडी (ता. जत) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान सचिन चाबरे अमर रहे, वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत या वीर सुपुत्राला जड अंतकरणांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
सोरडी येथील सचिन चाबरे २०१४ साली भारतीय सैन्य दलात १०६ इनफन्ट्री मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. बंगलोर येथे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर येथे सेवा केली. दोन वर्षांपासून दिल्ली संसद भवनाला गार्ड म्हणून कार्यरत होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची व हलाखीची आहे. आई-वडील हे ऊसतोडणी मजुरी करतात. त्यांनी खूप कष्टाने शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई,वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
एक वर्षापूर्वीच सचिन यांचा विवाह झाला होता. जेमतेम वर्षाभरातच पत्नी पूनम या वीरपत्नी झाल्या. अतिशय लहान वयातच त्यांचं सौभाग्य हिरावलं गेले आहे. तिचा व आई-वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
बुधवारी शहीद जवान सचिन चाबरे यांचे पार्थिव दिल्लीहून पुणे येथे विमानाने आणण्यात आले. तिथे पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देऊन मूळ सोरडी गावी सायंकाळी साडेसात वाजता आणण्यात आले.
रस्त्यावर रांगोळी काढली होती. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढली. ‘शहीद जवान सचिन चाबरे, अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
गावातील गर्दी टाळण्यासाठी चाबरे वस्ती जिल्हा परिषद शाळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. भाऊ सागर चाबरे यांनी भडाग्नी दिला.
आमदार विक्रम सावंत, संख अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्री, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी सैनिक बोर्डाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, सरपंच दत्ता चव्हाण यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.