कोरोनाबाधित कुटुंबातील वृद्धेवर केले अंतिम संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:38+5:302021-05-16T04:25:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : मिरजवाडी (ता. वाळवा) येथील एका कोरोनाबाधित कुटुंबातील ७९ वर्षीय वृद्धेचे निधन झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : मिरजवाडी (ता. वाळवा) येथील एका कोरोनाबाधित कुटुंबातील ७९ वर्षीय वृद्धेचे निधन झाले. वृद्धेच्या निधनानंतर आष्टा येथील शैलेश सावंत युवा मंच व विकास बोरकर युवाशक्ती या रुग्णवाहिकेच्या दीपक डिसले व साजन अवघडे चालकांनी वृद्धेवर अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधीलकी जपली.
आष्टा येथील नगरसेवक शैलेश सावंत युवा मंच व विकास बोरकर युवाशक्तीच्या वतीने आष्टा शहर व परिसरात रुग्णवाहिकेची सेवा देण्यात येत आहे. युवा मंचचे दीपक डिसले व साजन अवघडे अहोरात्र रुग्णांना सेवा देत आहेत. आष्टा शहरापासून हाकेच्या अंतरावर आष्टा-सांगली रस्त्यावरील मिरजवाडी गावात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथील ७८ वर्षीय आजीचे निधन झाले. त्यांना तीन मुले आहेत. मात्र मुलगा, सून, नातवंडे यांना कोरोनाची लागण झाली. यातच आजीचे निधन झाल्याने मृत्यूनंतरचे संस्कार कोणी करायचे हा प्रश्न निर्माण झाला.
पोलीसपाटील हरिदास पाटील व राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड यांना दीपक डिसले व साजन अवघडे यांना यांची माहिती दिली. मध्यरात्री तातडीने दीपक डिसले व साजन अवघडे यांनी पीपीई कीट घालून आजीच्या घरात जंतूनाशक औषध फवारणी केली.
दरम्यान, गावकऱ्यांनी स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी लाकडाची सोय केली. डिसले यांनी रुग्णवाहिकेमधून आजीचे पार्थिव स्मशानभूमीत नेले. या ठिकाणी चिता रचून आजीवर अंतिम संस्कार केले.
चौकट:
सेवेसाठी तत्पर
दीपक डिसले मागील अनेक वर्षांपासून रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत आहेत. वेळी-अवेळी त्यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होतात. अपघातग्रस्ताला रुग्णालयापर्यंत नेऊन त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करतात. कोरोना संकटातही त्यांनी अनेकांना जीवदान दिले आहे. त्यांना साजन अवघडे यांचीही साथ मिळत आहे.