अनिकेतवर पोलिस ठाण्यात अंत्यसंस्कार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:59 PM2017-11-09T23:59:40+5:302017-11-10T00:00:51+5:30

The funeral will be done at Aniket police station | अनिकेतवर पोलिस ठाण्यात अंत्यसंस्कार करणार

अनिकेतवर पोलिस ठाण्यात अंत्यसंस्कार करणार

Next


सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह पोलिसांनी लवकरात लवकर कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करून, त्याचा मृत्यू झालेल्या ठिकाणी पोलिस ठाण्यातच आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा इशारा कोथळे याच्या कुटुंबीयांनी गुरुवारी दिला. या प्रकरणात शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच संशयित आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अनिकेतचे वडील अशोक अण्णा कोथळे, आई अलका, पत्नी संध्या, दोन्ही भाऊ अमित व आशिष यांनी गुरुवारी पत्रकारांसमोर येत, त्याच्यावर बनावट गुन्हा दाखल केल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पोलिसांच्या फिर्यादीत अनिकेतला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करण्याची सुपारी उपनिरीक्षक युवराज कामटे याला कोणी दिली, त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, त्यासाठी कोणाची वाहने वापरली गेली, हेही उघड होण्याची गरज आहे.
अनिकेतच्या मृत्यूला अजूनही काहीजण जबाबदार आहेत. त्यांनाही आरोपी करण्यात यावे. या प्रकरणात उपअधीक्षक दीपाली काळे यांचीही चौकशी करावी. घटनेनंतर नातेवाईक पोलिस ठाण्यात गेले असता, त्यांची दिशाभूल केली. दोन्ही मुलांना हजर करतो, असे काळे यांनी सांगितले होते. पोलिस ठाण्याचा पदभार असलेले उपनिरीक्षक चव्हाण यांनाही या घटनेची माहिती नसावी, हे न पटण्यासारखे आहे. अनिकेत व अमोल भंडारे हे पोलिस ठाण्यातून पसार झाल्यानंतर माहिती देण्यासाठी ते घरी गेल्याचा दावा पोलिस करीत आहेत. पण आम्ही सगळे घरीच होतो. कोणीही माहिती देण्यासाठी घरी आले नव्हते, असेही त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, त्याची पत्नी व मुलीची जबाबदारीही शासनाने घ्यावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली. यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, रेखा पाटील आदी उपस्थित होते.
बनावट गुन्ह्यात अडकविले
अनिकेत व अमोल या दोघांनाही पोलिसांनी बनावट गुन्ह्यात अडकविल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. लूटमार प्रकरणातील फिर्यादी संतोष गायकवाड मूळचा कवलापूरचा आहे. तो मुंबईत राहतो. त्याला या दोघांची नावे कशी माहीत? चोरीचा बनाव करून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात केवळ अनिकेतलाच मारहाण करण्यात आली. अमोल भंडारेला पोलिसांनी मारहाण केलेली नाही. अनिकेतचा संगनमताने खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हाधिकाºयांनी घेतली कुटुंबीयांची भेट
अनिकेतच्या कुटुंबीयांची गुरुवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी भेट घेतली. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून दोषींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू, तसेच कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. अमोल भंडारे याला पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली, त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनीही त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली, तसेच सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

अमोल भंडारे दबावाखाली
या प्रकरणातील दुसरा संशयित अमोल भंडारे हा मुख्य साक्षीदार आहे. त्याच्यावर पोलिसांचा मोठा दबाव असल्याचे त्याचे चुलते दीपक भंडारे यांनी सांगितले. अमोलच्या जिवालाही धोका असून त्याला पोलिस संरक्षण दिले पाहिजे. जेव्हा मी व नगरसेवक युवराज बावडेकर त्याला पोलिस ठाण्यात भेटण्यास गेलो, तेव्हा त्याने मारहाण झाली नसल्याचे सांगितले. तो दबावाखाली असल्याचे जाणवत होते, असे भंडारे म्हणाले. तो सांगत होता, तसेच आम्ही सांगितले, असेही ते म्हणाले.

दुकान मालकावर आरोप
अनिकेत हा हरभट रोडवरील एका बॅग्ज हाऊसमध्ये कामाला होता. या दुकानदाराने त्याचा पगार दिलेला नाही. त्यामुळे तो पगार मागण्यासाठी गेला असता, त्यांच्यात वाद झाला होता. या दुकानदाराचे व युवराज कामटे याचे जवळचे संबंध आहेत. त्याची या दुकानात ये-जा होती. शिवाय या दुकानाच्या वरच्या माळ्यावर मालक अश्लील चाळे करीत असतो. त्याची माहितीही अनिकेतने कुटुंबीयांना दिली होती. या दुकानदाराने अनिकेतच्या पत्नीलाही धमकी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात या बॅग्ज हाऊसच्या मालकाचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.

Web Title: The funeral will be done at Aniket police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा