बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार मुस्लिम संघटना करणार
By admin | Published: November 7, 2014 10:55 PM2014-11-07T22:55:46+5:302014-11-07T23:32:48+5:30
हेळसांड रोखण्यासाठी मुस्लिम समाज संघटना पुढे
सांगली : महापालिका क्षेत्रामधील बेवारस मृतदेहांची हेळसांड रोखण्यासाठी मुस्लिम समाज संघटना पुढे आली असून, त्यांनी यापुढे अशा मृतदेहांवरील अंत्यसंस्काराची जबाबदारी संघटनेकडे देण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे आज (शुक्रवारी) केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व असिफ बावा यांनी केले. ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेऊन हे पाऊल उचलल्याची माहिती मुस्लिम संघटनेने दिली. याबाबत आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बेवारस मृतदेहांची होत असलेली हेळसांड व विटंबना हा चर्चेतला आणि गंभीर विषय आहे. बेवारस मृतदेहांवर अंत्यविधीची जबाबदारी शासनाएवढीच समाजाचीही आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील बेवारस मृतांची अंत्यविधी संस्काराची व्यवस्था आम्ही आमच्या संस्थेमार्फत स्वखर्चाने करण्याचे ठरवले आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आमच्या संस्थेकडे देण्यात यावी.यावेळी उमर गवंडी, शाहनवाज फकीर, अजिज नगारजी, शाहजान महात, बाळू महात आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
लोकमतचा
प्रभाव