द्राक्षावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव; तयार घड कुजले, बागायतदार धास्तावले

By हणमंत पाटील | Published: December 20, 2023 04:59 PM2023-12-20T16:59:16+5:302023-12-20T16:59:38+5:30

प्रदीप पोतदार कवठेएकंद ( सांगली ) : विक्रीसाठी तयार द्राक्ष घडावर आता नव्यानेच करप्यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ...

Fungal blight on grapes; Ready bunches rotted, gardeners panicked | द्राक्षावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव; तयार घड कुजले, बागायतदार धास्तावले

द्राक्षावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव; तयार घड कुजले, बागायतदार धास्तावले

प्रदीप पोतदार

कवठेएकंद (सांगली) : विक्रीसाठी तयार द्राक्ष घडावर आता नव्यानेच करप्यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रथम दर्शनी काळे चॉकलेटी डाग दिसत आहेत. तर काही दिवसांनी क्रॉचिंग होऊन घडच काळे पडून नासले जात आहेत. त्यामुळे द्राक्षबागेतील तयार घड कुजत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तासगाव, मिरज तालुक्यातील पाचशेहून अधिक एकर द्राक्ष बागेला त्याचा फटका बसला आहे.

करपा सदृश ‘झाणतो मानस’ सारख्या रोगाच्या संक्रमणाने बाधित बागेतील तयार मण्यांचे घड कुजून शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली द्राक्षे खराब होत आहेत. छाटणीपासून ६० ते ७० दिवस झालेल्या बागांवर असा प्रादुर्भाव आहे.

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, विसापूर, करोली, कवठे एकंद तसेच मिरज तालुक्यातील कवलापूर, सोनी, गावांतील द्राक्ष बागांवर करप्यासारखा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. अवकाळी पाऊस, वादळ, ढगाळ हवामान अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या द्राक्ष बागायत शेतकऱ्यांसमोर आता नव्यानेच करपा सदृश रोगामुळे संकट निर्माण झाले आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी दैनंदिन औषध फवारणी, प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वाढीव खर्च करावा लागत आहे.

संमिश्र वातावरणाचा फटका..

कवलापूर भागातील संक्रमित बागांना नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणेच्या संशोधन पथकाने भेट दिली आहे. त्यांच्याकडून संशोधन सुरू आहे. ढगाळ हवामान, धुके त्यानंतर कडक ऊन अशा संमिश्र वातावरणाचा परिणाम झाल्याची शक्यता जाणकार शेतकरी सांगत आहेत.

छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील एका बाजूच्या द्राक्ष घडावर तपकिरी काळे डाग येऊन फळकुजी सारखा प्रकार घडला आहे. बाग टिकवण्यासाठी औषध फवारणी बरोबरच कुजलेले खराब घड बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी. - नितीन माळी, शेतकरी, कवलापूर
 

द्राक्ष परिपक्वतेच्या काळात कीटकनाशके व अन्य औषध फवारणीचे कमी प्रमाण पाहिजे. जैविक जीवाणूंचा स्प्रे आवश्यक आहे. अति औषधाचा वापर टाळून जैविक व्यवस्थापन केल्यास द्राक्ष शेती वाचू शकते. - संदीप तोडकर, कृषी अभ्यासक.

Web Title: Fungal blight on grapes; Ready bunches rotted, gardeners panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.